नवी दिल्ली:74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर देशाच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन झाले. 44 विमानांचा फ्लायपास्ट खास आकर्षण ठरला. देश आज अत्यंत उत्साहात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. सालाबादप्रमाणे कर्तव्य पथवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सैन्यदलांनी मानवंदना दिली. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी सकाळी राष्ट्रीय युद्धस्मारकावर शहिदांना मानवंदना दिली. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी हे यावर्षीच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी होते. इजिप्तच्या सैन्यदलांनी शानदार संचलन करत उपस्थितांची मने जिंकली होती. यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
देवींच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन:महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांना प्रचंड महत्व आहे. हीच बाब ध्यानात घेऊन यंदा २०२३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात या शक्तीपीठांचा देखावा सादर केला गेला. यामध्ये कोल्हापूर, तुळजापूर, श्रीक्षेत्र माहूर व वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश होता. महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन २०२३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात झाले. या चित्ररथात माहूरच्या रेणुकादेवीच्या देखाव्याचाही समावेश होता.
कर्तव्यपथावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष: प्रजासत्ताकदिन निमित्त नवी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनातील मुख्य कार्यक्रमात यावर्षी महाराष्ट्राच्या वतीने ‘साडेतीन शक्ति्पीठे आणि नारी शक्ती’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सहभागी झाला. कर्तव्यपथावरील मुख्य कार्यक्रमात ‘मराठा लाईट इन्फंट्री’च्या वतीने पथसंचलन करण्यात आले. या रेजिमेंटच्या ‘बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या युद्ध घोषवाक्याने उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले.