मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 40 आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळ राष्ट्रवादीची सुत्रे आता शरद पवार यांनी हाती घेतली असून त्यांनी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांना पक्षातून निलंबित केल्याचे रविवारी जाहीर केले. त्यानंतर शरद पवार यांनी दिल्ली कार्यालयाच्या प्रमुख म्हणून सोनिया दुहन यांची नियुक्ती केली आहे. सोनिया दुहन या शरद पवार यांच्या विश्वासू मानल्या जातात.
सुप्रिया सुळेंनी दिले होते कारवाईचे पत्र :राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनिल तटकरे यांच्यावर कारवाई करण्यासाठी पत्र लिहिले होते. त्यानंतर लगेच या दोघांवर कारवाई केल्याचे ट्विट शरद पवार यांनी केले. या दोघांनीही पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात शपथ घेतलेल्या 9 आमदारांसह या दोघांवरही कारवाई करण्यात आली आहे.
अजित पवारांनी केली होती नियुक्ती :राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. प्रफुल्ल पटेल यांनी तटकरे यांना नियुक्तीचे पत्र दिले होते. तर जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादीच्या पक्षनेते पदावरुन आणि जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी करण्यात आल्याचेही अजित पवार यांनी जाहीर केले होते. मात्र त्यानंतर लगेच शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर कारवाई केली.
कोण आहेत सोनिया दुहन :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती आघाडीच्या प्रमुख म्हणून सोनिया दुहन या सक्रिय आहेत. 2019 ला जेव्हा अजित पवार यांनी बंड केले होते, त्यावेळी हे बंड मोडून काढण्यात सोनिया दुहन यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. इतकेच नाही, तर सोनिया दुहन यांनी राष्ट्रवादीच्या चार आमदारांची दिल्लीतील हॉटेलमधून अजित पवारांच्या तावडीतून सुटका करण्यात यश मिळवले होते. त्यामुळे 2019 ला सोनिया दुहन यांच्यामुळेच अजित पवार यांचे भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न भंगले होते. आता खुद्द शरद पवार यांनीच सोनिया दुहन यांची दिल्ली कार्यालय प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सोनिया दुहन यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचे फोटो दिल्लीच्या कार्यालयातून हटवले आहेत.
हेही वाचा -
- Maharashtra Politics Crisis Update : साहेबांसोबत असल्याचे सांगितल्यानंतर अमोल कोल्हे आज राजीनामा देणार, कारण काय?
- Two NCP office bearers arrested : बंडखोर आमदार वास्तव्यास राहिलेल्या हॉटेलमध्ये तोतयागिरी? राष्ट्रवादीच्या 2 पदाधिकाऱ्यांना अटक