मुंबई :राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी दुपारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्यात मोठा राजकीय भूकंप आला. गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारविरुद्ध बंड करून राज्यात सत्तापरिवर्तन घडवून आणले होते. आता अजित पवार यांनी काका शरद पवारांविरोधात जाऊन राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ केली आहे.
विरोधी पक्षांनी बंडाला भाजपला जबाबदार धरले : राज्यातील या घडामोडींवर आता देशभरातील नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजपच्या नेत्यांनी व मित्र पक्षांनी अजित पवारांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मात्र यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षांनी अजित पवारांच्या या बंडासाठी भाजपला आणि त्यांच्याद्वारे सत्तेच्या आडून करण्यात येणाऱ्या ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला जबाबदार धरले आहे.
शरद पवारांना काहीही होणार नाही - लालू : महाराष्ट्रातील या सत्तासंघर्षावर राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव म्हणाले की, 'शरद पवार हे भक्कम आणि ताकदवान नेते आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांना हादरवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काहीही होणार नाही. त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी होतील'. पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी भाजपवर जोरदार हल्ला केला. त्या म्हणाल्या की, 'भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांना भ्रष्ट म्हणत राहिले. मात्र आता त्यांनी महाराष्ट्रात त्यांनाच सरकारमध्ये घेतले आहे. यावरून भाजप हा सर्वात भ्रष्ट पक्ष असल्याचे दिसून येते'. भाजपने देशातील विरोधी पक्ष संपवण्यासाठी ईडी, सीबीआयच्या अधिकारांचा गैरवापर केला आहे, असेही त्या म्हणाल्या.