हैदराबाद:महाराष्ट्रात झालेल्या राज्यसभा आणि विधानसभेच्या निवडणुक निकालात आघाडीसरकार मधिल नाराजी नाट्याचे पडसाद पहायला मिळाले. महात्वाकांक्षी भाजपने राज्यसभेत आणि विधानसभेतही मतांची जुळवणी करत आपल्या पारड्यात यश पाडुन घेतले आणि संशयकल्लोळ तयार झाला. काय झाले आहे हे समजण्या आधिच राज्यात मोठा भुकंप झाला. शिवसेनेचे वजनदार मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना, अपक्ष असे सगळे मीळुन 25 आमदारांच्या गटाला घेऊन सुरत गाठले. सध्या त्यांच्या सोबत असलेले सगळे आमदार नाॅट रिचेबल आहेत. शिवसेना नाराजीचा फुटलेला बांध अडवणार का मग सरकार सोडणार असा पेच निर्माण झाला आहे.
सुरतचे हॉटेल नवे केंद्र:विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस समोर आली. नेते एकनाथ शिंदे सोमवार सायंकाळपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांच्यासोबत 25 पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील बिघाडी समोर आली आहे. सर्वजण सुरतच्या ग्रँड भगवती या हॉटेलमध्ये सर्व जण असल्याची माहिती मिळत आहे. हॉटेलमधील सर्व खोल्या बूक आहेत. हॉटेलमध्ये कोणीही जाऊ नये यासाठी हॉटेलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्या ठिकाणी कोणालाही जाऊ दिले नाही. महाराष्ट्रातील राजकीय भुकंपाचे नवे केंद्र आता सुरतचे ते हाॅटेल झाले असुन तेथे होत असलेल्या हालचालींवर सगळ्यांची नजर आहे.
काय आहे वाद:भाजपसोबत युतीत निवडणुक लढलेल्या शिवसेनेने सरकार स्थापनेच्या वेळी भाजपला वगळुन काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत घरोबा करत महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थापन केले. सर्वाधिक आमदार निवडुन आलेले असतानाही भाजपला सत्ते पासून रोकण्यात आले. तेव्हा पासुन भाजपने शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली नाही. सरकारच्या कारभारावर त्यातील मंत्र्यांवर कायम प्रहार केला. मोठ्या शहरातील वेगवेगळ्या प्रश्नावर आंदोलने केली. मशिदीवरील भोंग्याचा प्रश्न असो किंवा हनुमानचालीसा प्रकरण यात सरकारची कोंडी केली. तसेच मुख्यमंत्री आमदारांना तसेच इतर कोणाला भेटत नाहीत, आमदारांची कामे होत नाहीत असा प्रचार केला. त्याच बरोबर नाराज आमदारांशी जवळीक साधत त्यांच्याशी संबंध वाढवले.
विधानसभा निवडणुकीत मिळाले संकेत:देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्यनितीने राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही पाच उमेदवार निवडून आणत महाविकास आघाडीला हादरा दिला. आघाडीची तब्बल 21 मते फुटली. शिवसेनेची स्वत:ची आणि सहयोगी पक्ष आणि अपक्षांची तब्बल 12 मते फुटली. शिवसेनेचे 55 आमदार आहेत. प्रहार संघटनेचे 2, मंत्री शंकरराव गडाख आणि अपक्ष सहा अशी मिळून शिवसेनेकडे एकूण मतांची संख्या 64 इतकी आहे. मात्र, शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना मिळून 52 मते मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेचे 3 आणि घटक पक्षांची 9 अशी 12 मते फुटली. तर काँग्रेसचे देखील 3 आमदार फुटले. याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला झाला त्याचवेळी महाविकास अघाडी आणि विशेषत: शिवसेनेत सर्वकाही अलबेल नाही हे स्पष्ट झाले होते.
राऊत म्हणतात हे सगळे गैरसमजातून: एकनाथ शिंदे हे आमचे जिवाभावाचे सहकारी आहेत. ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांच्याशी बोलत नाही तो पर्यंत काही बोलता येणार नाही. पण महाराष्ट्रात मध्य प्रदेश आणि राजस्थान पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. आमचा काही आमदारांशी संपर्क होत नाही हे खर आहे. ते मुंबईत नाही. काही गैरसमजातून त्यांनी गुजरातला नेण्यात आले आहे. असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.एकनाथ शिंदेशी सुद्धा संपर्क झाला आहे. जे चित्र बाहेर निर्माण केलं जात आहे की भूकंप होईल किंवा अन्य काही होईल. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य वाटत नाही.असेही राऊत यांनी म्हणाले आहे.