मुंबई - देशात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने वाढली आहे. ऑक्सिजन सिलेंडर तयार करणाऱ्या कंपन्यांची कमतरता, वाढलेली मागणी यामुळे ऑक्सीजन सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे. केंद्र सरकारनेही देशात ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सबसीडीची घोषणा करावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले.
ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा यातील तफावत दूर करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रातील ऑक्सीजन प्लांट स्थापन करणाऱ्या कंपन्यांना मदत करण्यासाठी एक योजना आखली आहे. या अंतर्गत राज्यात नवे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येतील. ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकार आर्थिक मदत करणार आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
राज्यातील लस कमतरतेवरही त्यांनी भाष्य केले. जवळपास 12 लाख लोक दुसऱ्या डोसची वाट पाहत आहेत. मात्र, राज्याला लसीचा पुरवठा होत नाहीये. त्यामुळे लसीच्या तुटवड्याचा प्रश्न निकालात काढण्यासाठी मुंबई महापालिकेने लसीच्या एक कोटी मात्रा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेने आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती अर्ज मागवले आहेत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.