बैतुल (मध्य प्रदेश) -केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो शेतकऱ्यांसोबत राज्यमंत्री बच्चू कडू मध्य प्रदेशमध्ये पोहचले आहेत. त्यांच्या आंदोलनाला मध्य प्रदेशमधील भाजप सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी 'ई टीव्ही भारत'सोबत बोलताना केला. आज सकाळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यानंतर सर्व शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. 10 डिसेंबरला ते दिल्लीला पोहचतील.
महान पुरुषांनी शेवटच्या क्षणापर्यंत सामान्य लोकांच्या समस्या सोडवल्या. ते नेहमीच जनतेबरोबर होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीही एक पंतप्रधान म्हणून नाही, तर सेवक शेतकऱ्यांच्या समस्या ऐकतील. तेव्हाच या समस्येवर तोडगा निघेल, असे बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू आज भोपाळमध्ये थांबणार आहेत. भोपाळमधील मुख्यमंत्री निवास्थानाला ते घेराव घालण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिवराज यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.