बेळगाव (कर्नाटक) Maharashtra Karnataka Border Dispute :महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही मंत्री आणि खासदारांना बेळगावमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. बेळगावचे उपायुक्त नितेश पाटील यांनी हा प्रवेशबंदीचा आदेश जारी केला.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय : मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई, दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने यांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा आदेश जारी केलाय. १ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सवानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला. महाराष्ट्रातील मंत्री आणि खासदारांना बेळगावच्या हद्दीत प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती नितेश पाटील यांनी दिली.
१ नोव्हेंबरला काळा दिवस पाळण्यात येणार : चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई, दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने १ नोव्हेंबर रोजी मराठा मंदिर येथे महाराष्ट्र एकता समितीच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तेथे ते भावना भडकावणारे भाषण देण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आदेश जारी केले. महाराष्ट्र एकता समितीद्वारे १ नोव्हेंबरला काळा दिवस साजरा करण्याचं नियोजन आहे. त्यामुळे बेळगाव जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतला.
या आधीही बंदी घातली होती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान बोलताना ते म्हणाले की, बेळगाव जिल्हा प्रशासनानं १ नोव्हेंबरला कर्नाटक राज्योत्सवादरम्यान काळा दिवस साजरा करण्यावर बंदी घातली आहे. तथापि, काळा दिवस साजरा केला जाईल आणि महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी त्यामध्ये सहभागी होतील. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही बेळगावचे उपायुक्त नितेश पाटील यांनी सीआरपीसी १९७३ च्या कलम १४४ (३) अन्वये आदेश जारी करून चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई आणि महाराष्ट्र सीमा समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांच्या प्रवेशावर बंदी घातली होती.
हेही वाचा :
- Maharashtra Karnataka Border Dispute : सीमावादावर 'महाराष्ट्र एकीकरण समिती'ला पंतप्रधान कार्यालयाकडून पत्र; म्हणाले...
- Maharashtra Karnataka Border Dispute : बेळगाव विभाजनाचा कर्नाटकचा डाव; सीमावाद चिघळण्याची शक्यता