नवी दिल्ली:महाराष्ट्रातील नागरिकांचा विमान प्रवास आता स्वस्त होणार आहे. महाराष्ट्र सरकारने आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आज यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात विविध प्रकारच्या घोषणा फडणवीस यांनी केल्या आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी सर्वसामान्यांना अर्थसंकल्पातून गाजर मिळाले असल्याची टीका शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.
राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत:यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने विमानाच्या इंधनावर लावण्यात येणाऱ्या व्हॅट या करामध्ये २५ टक्क्यावरून १८ टक्केपर्यंत कपात केली आहे. त्यामुळे नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. सिंधिया यांनी याबाबत विविध ट्विट करून राज्य सरकारचे आभार मानत अभिनंदन केले आहे. व्हॅट कमी करण्याच्या या राज्य सरकारच्या निर्णयाचे त्यांनी एकप्रकारे स्वागतच केले आहे.
काय म्हणाले आहेत ज्योतिरादित्य सिंधिया: सिंधिया यांनी ट्विट करून म्हटले आहे की, व्हॅट कमी करण्याच्या या निर्णयासह महाराष्ट्र एकूण 19 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या लीगमध्ये सामील झाला आहे ज्यांनी गेल्या 1.5 वर्षांत व्हॅट दर तर्कसंगत केले आहेत. मुंबई, पुणे आणि रायगडसाठी वर्धित कनेक्टिव्हिटीबरोबरच, या निर्णयामुळे सर्वसामान्यांचा प्रवास अधिक परवडणारा होणार असून, विकासाला चालना मिळणार आहे.
विकासाला मिळणार चालना:सिंधिया म्हणाले की, मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. एअर टर्बाइन इंधनावरील व्हॅट 25% वरून 18% पर्यंत कमी करण्याचा प्रगतीशील निर्णय घेतल्याबद्दल मी राज्य सरकारचे अभिनंदन करतो. एकीकडे विमान इंधनाच्या किमती वाढत असताना दुसरीकडे हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा आमचा प्रयत्न असून, आमच्या प्रयत्नांमध्ये राज्य सरकारचा हा निर्णय उत्प्रेरक ठरेल, असेही सिंधिया यांनी म्हटले आहे. या निर्णयासह मुंबई, पुणे आणि रायगडसाठी वर्धित कनेक्टिव्हिटीकरिता १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याने या दोन्ही निर्णयांमुळे प्रवास अधिक परवडणारा होणार असून, देशाच्या विकासाला एकप्रकारे चालना मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: राज्य सरकारकडून अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; वाचा महत्वाचे मुद्दे