मुंबई - जगभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. सर्वच ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच महाराष्ट्रातील परिस्थितीही चिंताजनक आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना हॉटस्पॉटमध्ये महाराष्ट्राचाही समावेश झाला आहे. या यादीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे.
सध्या एकट्या महाराष्ट्रात आशिया खंडातील कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. जगाचा विचार केला, तर मागच्या 24 तासात महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्राच्या आधी ब्राझील आणि अमेरिका यांचा नंबर आहे.
महाराष्ट्रात मागील २४ तासात ५५ हजार ४६९ नव्या रुग्णांची भर पडली. तर ३४ हजार २५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. २९७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत ३१ लाख १३ हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील २५.८३ लाख जण कोरोनातून बरे झाले. ५६ हजार ३३० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ४ लाख ७२ हजार २८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.