नवी दिल्लीMahadev App Owner Ravi Uppal -महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपच्या दोन मुख्य मालकांपैकी एक असलेल्या रवी उप्पलला स्थानिक पोलिसांनी दुबईत ताब्यात घेतलं आहे. ईडीच्या आदेशानुसार इंटरपोलने रेड नोटीस जारी केली होती. या नोटीसनुसार स्थानिक पोलिसांनी कारवाई करत रवी उप्पलला ताब्यात घेतलं आहे.
- रवी उप्पला ताबा घेण्याकरिता ईडीचे अधिकारी दुबईच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. महादेव अॅपच्या माध्यमातून सट्टेबाजी आणि मनी लाँड्रिंग झाल्याचा रवी उप्पलवर आरोप आहे. या प्रकरणी छत्तीसगड पोलीस, मुंबई पोलिसांसह ईडीकडून तपास करण्यात येत आहे.
तपासाला वेग येण्याची शक्यता-महादेव बेटिंग अॅप प्रकरणात अभिनेता आणि उद्योगपतींची नावं असल्यानं या प्रकरणाकडं संपूर्ण देशाच लक्ष लागलेलं आहे. 15,000 कोटी रुपयांच्या महादेव सट्टेबाजी अॅप घोटाळ्यानं तपास संस्थांच्या अधिकाऱ्यांची झोप उडविली आहे. तपास संस्थांची चौकशी सुरू असताना रवी उप्पल हा विदेशात लपून बसला होता. त्यामुळे तपास संस्थांना चौकशी करण्यात अडथळा येत होता. रवी उप्पलला भारतात आल्यानंतर तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.
- माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीनंतर मुंबईत रवी उप्पल आणि शुभ सोनी यांच्यावर फसवणूक आणि जुगार अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आरोपींना हवाला व्यवहारातून पैसे मिळाल्याचा संशय असल्यानं आरोपी हे ईडीच्या रडारवर आहेत.