डेहराडून - निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे डेहराडून येथील खासगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. ते 65 वर्षाचे होते. महाकुंभमध्ये सामील होण्यासाठी मध्य प्रदेशातील चित्रकूट येथून ते हरिद्वारमध्ये आले होते. कुंभमेळ्यात कोरोनाने निधन होणारे कपिल देव हे पहिले मोठे संत आहेत.
महामंडलेश्वर कपिल देव यांना 3 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना किडनी निकामी होणे आणि ताप येणे ही समस्या होती, असे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले. तसेच त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. रुग्णालयाचे संचालक पवन शर्मा यांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली.
महंत नरेंद्र गिरींनाही झाला होता कोरोना -
अखिल भारतीय अखाड़ा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्यावर एम्स ऋषिकेश येथे उपचार सुरू आहेत. नरेंद्र गिरी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तेव्हा त्यांना हरिद्वार येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तब्येत बिघडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना एम्स हृषीकेशमध्ये हलवले. सध्या महंत नरेंद्र गिरी यांची प्रकृती स्थिर आहे.