पुणे -वाढदिवस म्हटला की एक वेगळाच आनंद प्रत्येकाच्या जीवनात असतो. वाढदिवसाला बेकरीमध्ये तयार केलेला केक कापून तो साजरा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात फळांचा केक कापण्याचा ट्रेंड आलायं. या ट्रेंडला नागरिकही भरभरून प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे आता केक कापून नाही. तर फळे कापून वाढदिवस साजरा केला जातोय. केक कापण्यापेक्षा फळे कापून वाढदिवस साजरी करण्याची संकल्पना बळीराजासाठी सुखदायक आहे.
फळांचा केक कापण्याची संकल्पना लोकप्रिय झाली आहे. महाराष्ट्रात शेतकरी फळांचे उत्पादन घेतात. कलिंगड, चिकू, पेरू, केळी, संत्री, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, पपई ही फळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पिकवली जातात. मात्र, त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नाही. बाजाराच्या मागणीवर शेतकऱ्यांना मिळाणारे पैसे अवलंबून असतात. त्यामुळे या नव्या ट्रेंडनुसार बर्थडेला फळ संस्कृतीची जोड दिल्यास फळांची मागणीच वाढेल.
राज्यातील बर्याच भागातील फळांचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे बाजारपेठेत अतिरिक्त पुरवठा झाल्याने फळांच्या किंमती खाली आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे आधीच शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच आता अतिरिक्त पुरवठ्यामुळे व्यापारी कमी दराने शेतकऱ्यांचे उत्पादन खरेदी करीत आहेत. यावर उपाय म्हणून शेतकर्यांनी सोशल मीडियावर ही नाविन्यपूर्ण मोहीम राबवली आहे. हा ट्रेंड सोशल मीडियावर जोर धरत आहे आणि शेतकर्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे पुण्यातील वरिष्ठ कृषी पत्रकार व विश्लेषक दीपक चव्हाण यांनी सांगितले.
वाढदिवसाला केकऐवजी फळे -