मदुराई : भारतीय रेल्वेच्या महसूल विभागाच्या वतीने विविध रेल्वे स्थानकांवर महसूल वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अनेक रेल्वे स्थानकांवर चित्रपटाच्या शूटिंगलाही परवानगी देण्यात आली आहे. या माध्यमातून संबंधित स्थानकांमध्ये रेल्वेला लक्षणीय उत्पन्न मिळत आहे.
5000 रुपये आकारून लग्नाचे फोटो काढता येणार : आता तामिळनाडू मध्ये रेल्वे स्थानकांवर लग्नाच्या शूटिंगसाठी किंवा जाहिरातदारांना फोटो काढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मदूराई रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे. ही योजना तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. रेल्वेने याचे शुल्क देखील निश्चित केले आहे. आता नवविवाहित जोडपे 5000 रुपये शुल्क आकारून दक्षिण रेल्वेच्या मदुराई विभागातील मदुराई रेल्वे स्थानकावर लग्नाचे फोटो काढू शकतात. तसेच त्यांना रेल्वेगाडीची पार्श्वभूमी हवी असल्यास 1500 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
ट्विटरवर मार्गदर्शक तत्त्वांसह सूचना जाहीर : मदुराई विभागीय रेल्वे प्रशासनाने आपल्या अधिकृत ट्विटर पेजवर याची माहिती दिली आहे. मदुराई विभागातील इतर रेल्वे स्थानकांसाठी याचे भाडे 3 हजार रुपये (अधिक एक हजार रुपये प्रति डबा) असेल. मदुराई रेल्वे स्थानकावर लग्नाचे फोटोशूट करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मदुराई विभागीय व्यवस्थापकाकडे तक्रार पाठवल्यानंतर मदुराई रेल्वे विभागीय प्रशासनाने मार्गदर्शक तत्त्वांसह ट्विटरवर ही सूचना जारी केली आहे.