छिंदवाडा (मध्य प्रदेश) - वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे एनजीटीने फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे. परंतु छिंदवाड्यातील पारडसिंगा गावातील युवक आणि महिलांच्या गटाने एकत्र येत असे फटाके बनविले आहेत, जे फुटल्यानंतर आवाज आणि धूर न निघता फळ आणि भाज्या निघणार आहेत. या फटाक्यांना 'सीड बॉम्ब' असे नाव देण्यात आले आहे.
मध्य प्रदेश : आता फटाक्यांपासून मिळणार फळे आणि भाज्या अनेकदा लहान मुले फटाके फोडल्यानंतर आनंद साजरा करतात. त्यानंतर ते फेकून देतात. या फटाक्यांमुळे मुलांना फटाक्यांचा आनंद घेता येणार असून ते फेकल्यानंतर जमीनीतून फळ आणि भाज्या उगवणार आहे. हे फटाके बाजारात विकल्या जाणार्या सामान्य फटाक्यांसारखेच दिसत असले तरी या फटाक्यांमध्ये बारूद नसून बियाणे भरण्यात आले आहेत.
22 प्रकारच्या बियाण्यांपासून बनविले फटाके-
प्रत्येकाला फटाके फोडायला आवडतात; परंतु यामुळे पर्यावरणाबरोबरच जनावरांनाही त्रास होतो. म्हणूनच आम्ही असे फटाके बनविले असल्याचे नूतन यांनी सांगितले. या फटाक्यांमध्ये एकूण 22 बियाणी भरली असून यापासून लोकांना भाजीपाला आणि फळे मिळणार आहेत. विशेष म्हणजे हे फटाके बनविणारे मशिन या महिलांनी घरी बनविले असून याद्वारे अनेक युवकांना रोजगारही मिळाला आहे. या फटाक्यांना बाजारात मिळणाऱ्या फटाक्यांसारखे रूप दिले असले, तरी नागरिकांना बियाण्यांची माहिती मिळावी, या उद्देशाने या फटाक्यांना भाज्या तसेच बियाण्यांची नावे देण्यात आली आहेत.
ग्रामीण भागातील महिलांना मिळतोय रोजगार -
हे फटाके बनविण्याचे काम युवक आणि महिलांद्वारे करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे. सोबतच वीज वाचविण्यासाठी जास्तीत जास्त काम हाताने करण्यात येते. या फटाक्यासोबतच प्रत्येक सणानुसार आवश्यक असणारे साहित्यदेखील या युवक आणि महिलांकडून बनविण्यात येते. फटाक्यांपूर्वी या महिलांनी राखी आणि लग्नाचे कार्ड देखील बनविली आहेत.
हेही वाच- प्रदूषणाची पातळी वाढली; पूर्व दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक 337 वर