बैतूल: मध्यप्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची समस्या वाढू लागली आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलांना जीव गमावावा लागला आहे. बैतूल जिल्ह्यात, अशीच धक्कादायक घटना घडली आहे. एका घरात घुसून भटक्या कुत्र्याने 6 वर्षाच्या मुलावर हल्ला केला. जखमी झालेल्या मुलाला त्याची आई आणि नातेवाईकांनी बैतूल येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
जिल्हा रुग्णालयात दाखल: मिळालेल्या माहितीनुसार,कचरबोह गावात राहणारे संतोष कोडाती यांचा हरीश नावाचा मुलगा हा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दिव्यांग आहे. बुधवारी हरीशची आई कविता शेतात काम करण्यासाठी गेली होती. हरीश घरी एकटाच होता. त्याचवेळी भटक्या कुत्र्याने घरात झोपलेल्या हरीशवर हल्ला केला. या हल्ल्यात हरीशच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत झाली. हरीशची आई घरी आली, तेव्हा तिला हरीश जखमी अवस्थेत दिसला. त्यानंतर तिने शेजाऱ्यांना याची कल्पना दिली. त्यानंतर मुलाला खासगी वाहनातून मुलताई येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात आणले. तेथे मुलावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला बैतूल येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.