इंदूर (मध्यप्रदेश): जिल्ह्यातील जुनी पोलीस स्टेशन हद्दीतील बेलेश्वर मंदिरात रामनवमी पूजेदरम्यान मोठी दुर्घटना घडली. मंदिरात असलेल्या विहिरीवरील स्लॅब अचानक कोसळला, त्यामुळे 24 हून अधिक लोक अंगणात बांधलेल्या विहिरीत पडले. माहिती मिळताच जुनी पोलिस स्टेशन आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने 3 पोलीस ठाण्यांमधून पोलीस बंदोबस्तही पाचारण करण्यात आला होता. पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार, 10 जणांना वाचवण्यात यश आले असून, यामध्ये 2 मुली आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटद्वारे बचाव कार्याची माहिती दिली आहे. या घटनेत ३ महिला अन् दोन पुरुषांसह एकूण १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
लोकप्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले : मंदिरात झालेल्या अपघाताची माहिती मिळताच माजी मंत्री जितू पटवारी आणि प्रादेशिक आमदार आकाश विजयवर्गीय घटनास्थळी पोहोचले. इंदूरमधील मंदिर दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी, आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या. तसेच लोकांना वाचवले पाहिजे आणि जीवितहानी टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करून या दुर्घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले असून बचाव कार्याची माहितीही दिली आहे. मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, आतापर्यंत 10 जणांची सुटका करण्यात आली आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी बचाव कार्यात गुंतलो आहोत, मी प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. आतमध्ये 9 जण सुरक्षित आहेत.