हैदराबाद - मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, ओडीशा, नागालँड, झारखंड, छत्तीसगड आणि तेलंगाणा राज्यात आज विधानसभेच्या पोटनिवडणूका होत आहे. यातील मध्यप्रदेशातील निवडणूक काँग्रेस भाजपमध्ये अटीतटीची होणार आहे. मध्यप्रदेशात २८ जागांसाठी तर गुजरात ८ तर उत्तर प्रदेशात ७ जागांसाठी मतदान होणार आहे. कर्नाटक ओडीशामध्ये २ जागांवर मतदान होईल. तर छत्तीसगड, तेलंगाणा आणि हरियाणात एका जागेसाठी मतदान होणार आहे.
मध्यप्रदेश -
मध्यप्रदेशात विधानसभेच्या २८ जागांसाठी आज(मंगळवार) पोटनिवडणुका होत आहेत. भाजपाला बहुमतासाठी आठ जागा हव्या असल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेस पक्षातून बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत २० पेक्षा जास्त आमदारांनी पक्ष सोडला होता. त्यानंतर कमलनाथ यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार कोसळले. राजकीय उलथापालथ झाल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सत्तेत आली. त्यामुळे आता भाजपा सरकार खाली खेचण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. काँग्रेस आणि भाजपामध्ये मध्यप्रदेशात अटीतटीची लढत पहायला मिळत आहेत.
उत्तर प्रदेश -
उत्तर प्रदेशात ७ जागांवर पोटनिवडणुका होत आहेत. नौगाव सदात, टुंडला, बुलंदशहर सदर, बांगरमऊ, मल्हनी, घाटमपूर आणि देवरिया सदर मतदार संघात निवडणुका होत आहेत. येथील सहा जागा आधी भाजपकडे आणि १ जागा समाजवादी पक्षाकडे होती.