लखनऊ (उत्तर प्रदेश) -सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिची आई सुनंदा शेट्टी यांच्या विरोधात कोट्यवधीच्या फसवणुकीचे गुन्हे लखनऊ येथील दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत. विभूती खंड पोलीस ठाण्यात ओमेक्स हाइट्स येथे राहणाऱ्या ज्योत्सना चौहान यांनी तर रोहित वीर सिंह यांनी हजरगंज पोलीस ठाण्यात दोघींविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन शिल्पा शेट्टी व सुनंदा शेट्टी यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहे. शिल्पा शेट्टी व सुनंदा शेट्टी यांची चौकशी करण्यासाठी लखनऊ पोलिसांचे पथक मुंबई येथे रविवारी (दि. 8 ऑगस्ट) येथे दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिची आई सुनंदा शेट्टी यांच्यावर कोट्यवधींची फसवणुक केल्याचा गुन्हा लखनऊच्यो दोन विविध पोलीस ठाण्यात दाखल आहे. शिल्पा शेट्टी व सुनंदा शेट्टी यांनी स्किन सलून व स्पा नावाने एक कंपनी सुरू केली होती. कंपनी सुरू केल्यानंतर जबाबदार अधिकाऱ्यांनी काही जणांशी संपर्क साधला व त्यांना कंपनीचे सेंटर देण्यासाठी कोट्यवधी रुपये त्यांच्याकडून उकळण्यात आले आहे, अशी तक्रार करण्यात आली आहे. ओमेक्स हाइट्स येथे राहणाऱ्या ज्योत्सना चौहान यांनी विभूति खंड पोलीस ठाण्यात तर रोहित व वीर सिंह यांनी हजरतगंज कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी हजरतगंज पोलिसांनी एक महिन्यापूर्वी शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांना नोटीस पाठवली होती. पण, विभूति खंड येथे दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत चौकशी करण्यासाठी पोलीस उपायुक्तांचे विशेष पथक तपास करत रविवारी (दि. 8 ऑगस्ट) मुंबईला पोहोचले होते.