नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस कंपन्यांनी सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. देशातील गॅस सिलिंडरच्या किमतींबाबत आज सकाळी मोठी घोषणा केली गेली आहे. विशेष म्हणजे, गॅस कंपन्यांकडून प्रत्येक महिना सुरु होण्यापूर्वी गॅस सिलिंडरची किंमत निश्चित केली जाते.
व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी केले : शनिवारी सकाळी सरकारी गॅस कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. गॅस कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडर नव्हे तर फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात घट केली आहे. देशातील सर्व मेट्रो शहरांमध्ये ही कपात करण्यात आली आहे. म्हणजेच, घरगुती सिलिंडरची किंमत अद्यापही पूर्वीप्रमाणेच आहे. राजधानी दिल्लीत सध्या घरगुती गॅसच्या एका सिलिंडरची किंमत 1103 रुपये एवढी आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात कंपन्यांनी घरगुती सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढवली होती. तर व्यावसायिक गॅसच्या किमतीत देखील 350 रुपयांनी वाढ केली गेली होती.
इतक्या रुपयांनी घटले दर : शनिवारपासून राजधानी नवी दिल्लीत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत तब्बल 91.50 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आता नवीन दर 2028 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे. त्याचबरोबर कोलकातामध्ये 89.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता तेथे नवीन सिलिंडर 2132 रुपयांना मिळणार आहे. त्याच वेळी, मायानगरी मुंबईमध्ये किंमत 91.50 रुपयांनी कमी झाली आहे. आता तेथे प्रति सिलिंडरची नवीन किंमत 1980 रुपये एवढी आहे. चेन्नईमध्ये 75.50 रुपयांची घट झाली आहे. नवीन किंमत 2192.50 रुपये एवढी आहे.