नवी दिल्ली Parliament Attack:संसदेच्या सुरक्षेत बुधवारी एक मोठी चूक झाली. दोन तरुणांनी लोकसभेचं कामकाज चालू असताना प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारली. या दोघांनी सभागृहाचं लक्ष वेधण्यासाठी पिवळ्या धुराचा वापर केला. यामुळे संपूर्ण सभागृहात पिवळा धूर पसरला. दरम्यान, सभागृहात उपस्थित असलेल्या खासदारांनी या दोघांना पकडलं आणि सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिलं. या घटनेमुळे नव्या संसदेच्या सुरक्षेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत.
ओम बिर्ला यांची प्रतिक्रिया : आता या घटनेवर लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी प्रतिक्रिया दिली. झालेल्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. "शून्य तासाला घडलेल्या या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. दिल्ली पोलिसांना आवश्यक सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात आढळून आलं की, हा केवळ धूर होता. धुराची काळजी करण्याची गरज नाही", असं ओम बिर्ला यांनी सांगितलं. संसदेत घुसलेल्या या दोन्ही तरुणांना अटक करण्यात आल्याचं ओम बिर्ला यांनी सांगितलं. त्यांच्याकडील साहित्यही जप्त करण्यात आलं आहे.