मुंबई :काँग्रेस पक्ष आगामी लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी I.N.D.I.A. आघाडीची स्थापना करण्यात आली. मात्र या आघाडीची गाडी अजूनही रुळावर आलेली नाही. जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरून आघाडीत बिघाडी कायम आहे. शुक्रवारी हा वाद आणखी तीव्र झाला. आघाडीतील काही पक्षांनी पुढील वर्षीची लोकसभा निवडणूक 'एकट्यानं' लढण्याचे संकेत दिले आहेत. तसंच काही पक्ष विधानसभा निवडणुकांत आपापल्या राज्यात 'तडजोड' करायला तयार नाहीत.
काय म्हणाले संजय राऊत : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांचा पक्ष महाराष्ट्रात सर्वात मोठा असल्याचं प्रतिपादन केलंय. जागावाटपाच्या चर्चेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. "हा महाराष्ट्र असून शिवसेना इथला सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. उद्धव ठाकरे राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि के सी वेणुगोपाल यांच्याशी सकारात्मक चर्चा करतायेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेना दादरा आणि नगर हवेलीसह नेहमीच २३ जागांवर लढत आली आहे. आम्ही यावर ठाम राहू", असं संजय राऊत म्हणालेत.
ममता बॅनर्जींचं सूचक वक्तव्य : संजय राऊत यांच्या या व्यक्तव्यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी, राज्यात लोकसभा निवडणूक एकट्यानं लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. "देशभर INDIA आघाडी असेल. मात्र बंगालमध्ये टीएमसी भाजपाशी लढेल आणि पराभूत करेल. बंगालमध्ये फक्त टीएमसीच भाजपाला धडा शिकवू शकते, इतर कोणताही पक्ष नाही," असं सूचक वक्तव्य ममता बॅनर्जींनी केलं आहे.
काँग्रेसचं स्पष्टीकरण : दुसरीकडे, काँग्रेसनं सर्व पक्षांशी 'खुल्या मनानं' चर्चा केली जाईल, असं प्रतिपादन केलंय. "आम्ही खुल्या मनानं जागा वाटपावर चर्चा करू. जागा वाटपाची चर्चा पुढे नेण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी आव्हानं आहेत. त्यामुळे सर्व पैलूंचा विचार करून चर्चा व्हावी. जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. पुढेही सुरू राहील. आम्ही जे करणं आवश्यक आहे ते करू", असं काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले.
हे वाचलंत का :
- शिवसेना लोकसभेच्या २३ जागा लढवण्यावर ठाम, गल्लीबोळातील नेत्यांचं कोण ऐकणार - संजय राऊत
- जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांचा राजीनामा, नितीश कुमार यांच्या हाती पुन्हा पक्षाची धुरा