नवी दिल्ली - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला. फक्त आपली खुर्ची वाचवण्यासाठी नितिश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे-पुढे पिंगा घालतात, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. नितिश कुमार यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोदी यांना विरोध केला होता. आत तेच मोदींच्या आशीर्वादासाठी व्याकूळ झाल्याचे पाहायला मिळत आहे, असेही चिराग पासवान म्हणाले.
महागठबंधनची भीती दाखवत, नितिश कुमार निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या सत्ता काळात त्यांनी काय विकास केला, हे कोणालाच माहीत नाही. आता फक्त केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा उल्लेख करत आहेत. जनता दल (यू)ने राज्याचे मोठे नुकसान केले आहे, असे पासवान म्हणाले. तसेच बिहारच्या जनतेचा पैसा लुटणाऱ्या हिशोब द्यावा लागणार आहे. या सरकारच्या काळातील घोटाळ्यांची चौकशी करून सर्वांना तुरुंगात पाठवण्यात येईल, असेही पासवान म्हणाले.