नामदेव महाराजांनी भारताताच्या कानाकोपऱ्यात जाऊन भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संतकवींपैकी (Varkari Santkavi of Maharashtra) एक आहेत. संत नामदेव महाराजांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 रोजी (life journey of Sant Namdev Maharaj) झाला होता. पुढे 1291 साली नामदेवांची संत ज्ञानेश्वरांसोबत भेट झाली. तेव्हा त्यांना गुरुशिवाय आपली भक्ती अधूरीच आहे, याची जाणीव झाली. कालांतराने नामदेव 'नागनाथ औंढा' येथे गेले आणि विसोबा खेचर यांच्याकडून उपदेश घेतला आणि शिष्यत्व पत्करले. Sant Namdev Maharaj
जन्म : संत नामदेव महाराज (इ.स. १२७० ते जुलै ३, इ.स. १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत.
पारिवारीक माहिती : दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता, म्हणजे ते शिंपी होते. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ (इ.स.१२७०)मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे पंढरपूरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली. पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणार्या संत जनाबाई या देखील त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.
मराठीतील पहिले चरित्रकार : नामदेव हे ‘मराठीतील’ पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे, आद्य प्रचारक होते. त्यामुळे आज त्यांच्या जन्म स्थानी पंजाबी मंडळी, त्यांचं जन्म स्थान असलेल्या नर्सी या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत.
वारकरी संप्रदायाचे प्रचारक :भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले. वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.