छिंदवाडा ( मध्यप्रदेश ) : मध्य प्रदेशात उष्णतेचा प्रकोप सुरूच आहे. कडक ऊन आणि उष्णता वाढताच लोकांना लिंबाची गरज भासू लागते. पण या कडक उन्हात जर तुम्ही लिंबूपाण्याने घसा शांत करण्याचा विचार करत असाल तर, त्यासाठी तुम्हाला तुमचा खिसा मोकळा करावा लागेल. कारण मध्यप्रदेशच्या छिंदवाडामध्ये 1 लिंबू 25 ते 30 रुपयांना मिळतो आहे. चला तर जाणून घेऊयात काय आहे कारण..
लिंबाचे भाव गगनाला भिडले : उष्मा वाढल्याने अचानक लिंबाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. तसेच किमतीतही विक्रमी वाढ झाली आहे. लिंबू विकत घेण्यासाठी लोक जेव्हा बाजारात पोहोचतात तेव्हा त्याची किंमत ऐकूनच त्यांचे दात आंबट होत आहेत. लिंबाचा भाव 250 ते 300 रुपये किलोने विकला जात असल्याचे ऐकून अनेकजण ते न घेताच परतत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी छिंदवाडा मंडईत 140 ते 150 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या लिंबाचा दर 250 ते 300 रुपये किलो झाला आहे. उष्णता वाढत असल्याने लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे. अशा स्थितीत छिंदवाडा येथे लिंबाची लागवड होत नसताना बाहेरून पुरवठा केला जात आहे. इतर राज्यांमध्ये आणि जवळपासच्या मंडईंमध्ये पूर्वीच्या तुलनेत काही प्रमाणात भाव वाढले आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशातील अनेक शहरांमध्ये लिंबाच्या दरात मोठी झेप दिसून येत आहे. स्थानिक मंडईंमध्ये दुकानदार 25 ते 30 रुपये किमतीचा 1 लिंबू देत आहेत.