नवी दिल्ली :आजच्या काळात पॅनकार्ड हे तुमच्या आर्थिक आरोग्याची स्थिती सांगणारा एक महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. तुमचा संपूर्ण डेटा आयकर विभागाकडे फक्त त्यावर नोंदवलेल्या नंबरद्वारेच राहतो. यामुळेच आयकर विभाग कार्डधारकांना पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी सतर्क करत आहे.
लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च 2023 :आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च 2023 आहे. या तारखेपर्यंत आधार आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास, तुमचा पॅन सक्रिय होणार नाही. यामुळे बँक खाते उघडणे, आयकर परतावा, शेअर्समध्ये गुंतवणूक करणे, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे यासारखे आर्थिक व्यवहार तुम्ही करू शकणार नाहीत.
ट्विटद्वारे दिला अलर्ट :आयकर विभागाने मंगळवारी, १७ जानेवारी रोजी विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून पॅन कार्डधारकांना याची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आयकर कायदा, 1961 नुसार, सर्व पॅनकार्ड धारकांना 31 मार्च 2023 पूर्वी त्यांचे पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. लिंक न केलेला पॅन १ एप्रिल २०२३ पासून निष्क्रिय असेल. आपल्या ट्विटमध्ये विभागाने लिहिले की, तातडीची सूचना. उशीर करू नका, आजच लिंक करा.
कसे लिंक कराल आधार कार्ड :आधार कार्ड ही युनिक ओळख आहे. या मदतीने भारतीयाला मूलभूत सुविधा पुरविल्या जातात. भारतीय नागरिकाची ओळख आणि त्याची बायोमेट्रिक माहितीही आधार कार्डमध्ये समाविष्ट आहे. तुम्ही बायोमेट्रिक आधार पडताळणीद्वारे किंवा एनएसडिएल आणि युटिआयटिएसएलच्या पॅन सेवा केंद्रांना भेट देऊन लिंक करू शकता.