महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'भारताची अन्न सुरक्षा भांडवलदारांच्या हाती सोपवण्याच्या रणनीतीचा एक भाग कृषी कायदे' - शेतकरी आंदोलन

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी शेतकरी आंदोलनला पाठिंबा दर्शवला आहे. आज त्यांनी एक व्हिडिओ जारी करत केंद्रावर टीका केली. पंजाबची शेती नष्ट करण्यासाठी आणि काही निवडक भांडवलदारांच्या हाती भारताची अन्न सुरक्षा सोपविण्याच्या एका मोठ्या रणनीतीचा भाग म्हणजे कृषी कायदे आहेत, असे त्यांनी ट्विट केले आहे.

नवज्योत सिंग सिद्धू नवज्योत सिंग सिद्धू
नवज्योत सिंग सिद्धू

By

Published : May 28, 2021, 4:10 PM IST

नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी शेतकरी आंदोलनला पाठिंबा दर्शवला आहे. आज त्यांनी एक व्हिडिओ जारी केला. आज आपण एक राजकीय लढाई लढत आहोत. शेतकर्‍याचे नुकसान हे संपूर्ण देशाचे आर्थिक नुकसान आहे. हा राजकीय लढा महत्त्वाचा आहे, परंतु आपल्याला आर्थिक पर्याय विकसित करण्याची गरज आहे, असे सिद्धू म्हणाले.

नवज्योत सिंग सिद्धू यांचे टि्वट

पंजाबची शेती नष्ट करण्यासाठी आणि काही निवडक भांडवलदारांच्या हाती भारताची अन्न सुरक्षा सोपविण्याच्या एका मोठ्या रणनीतीचा भाग म्हणजे कृषी कायदे आहेत, असे त्यांनी ट्विट केले आहे. नवज्योतसिंग सिद्धू आता उघडपणे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने 'ब्लॅक डे' पाळला होता. यात नवज्योत सिंग यांनीही सहभाग घेत आपल्या घरावर काळा झेंडा फडकवला होता.

शायराना अंदाजात केंद्रावर टीका -

यापूर्वीही नवज्योतसिंग सिद्धू यांनी टि्वट करून केंद्रावर शायराना अंदाजात टीका केली होती. सरकार काळे कायद्यांची परंपराच चालवली आहे. ते तुम्हाला तुरूंगात भोजन देण्याची भाषा करत आहे(ये काले क़ानूनों की तहज़ीब है जनाब, ये क़ैद कर खाना देने की बात करते हैं), असे त्यांनी म्हटलं. तर दुसऱ्या एका टि्वटमध्ये त्यांनी गरज पडल्यास सर्व एकत्र येत आहेत. जसे, मुंगसाची सापासोबत मैत्री होत आहे (मतलब पड़ा तो सारे अनुबन्ध हो गये, नेवले के भी साँपों से सम्बन्ध हो गये), असे त्यांनी म्हटलं. यापूर्वीही त्यांनी अनेक टि्वट करून शायरीतून सरकारवर बाण सोडले आहेत.

सिद्धू पुन्हा राजकारणात सक्रिय -

नवज्योत सिंग सिद्धू यांनी जुलै 2019 मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात आलं होतं. कॅप्टन आणि सिद्धू यांच्यातील वाद टोकाला गेले होते. आता पंजाबमधील विधानसभा निवडणुका जवळ आल्याने सिद्धू पुन्हा राजकारणात सक्रिय होत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांची भेट घेतली होती. शेतकरी आंदोलनावर चर्चा करण्यासाठी त्यांना बोलवण्यात आल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले होते. नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाबमध्ये नवी जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details