उत्तरकाशी (उत्तराखंड) Landslide in Uttarakhand : उत्तराखंडातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दांडल गावापर्यंत निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली आहे. एनएचआयडीसीएलच्या निर्देशानुसार एका कंपनीमार्फत हा बोगदा बांधण्यात येत आहे. यात बोगद्यात 36 हून अधिक मजूर अडकले असल्याचं सांगण्यात येत आहे. बोगद्यात नेमके किती कामगार अडकले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. कंपनीकडून डेब्रिज हटवण्याचं काम सुरू आहे. घटनास्थळी पाच 108 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस-प्रशासनाचं पथक घटनास्थळी उभं असून बचावकार्य सुरू आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी ही दुर्घटना घडलीय.
एसपी अर्पण यदुवंशी घटनास्थळी : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवेंद्र पटवाल म्हणाले की, बोगद्यात भूस्खलनाची पुष्टी झालीय. एनडीआरएफ आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. एसपी अर्पण यदुवंशी यांनी सांगितलं की, घटनेनंतर अनेक बचाव पथकं पोहोचली आहेत. त्यांनी सांगितलं की, कंपनीच्या रेकॉर्डनुसार आतापर्यंत 36 कामगार बोगद्यात अडकले आहेत. सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडल्याचं त्यांनी सांगितलं. याठिकणी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. लवकरच सर्वांची सुखरूप सुटका केली जाईल, असंही ते म्हणाले. बोगद्याच्या आत ऑक्सिजन पाईप पोहोचवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. या घटनेत जीवितहानीबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.