पावसामुळे भूस्खलनाची घटना शिमला :हिमाचल प्रदेशात पावसाने परत एकदा हाहाकार माजवला आहे. मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून विविध ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. शिमलामधील समर हिल येथे असलेल्या शिव मंदिर परिसरात भूस्खलन झाले असून यात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे बचावकार्य अजून सुरू आहे.
घटनास्थळी मुख्यमंत्री दाखल : मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर हिमाचल प्रदेशचे आरोग्य मंत्री आणि सोलन विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनीराम शांडिल रविवारी रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले होते.
शिमला येथे घडलेली घटना दुःखदायक आहे. ढिगाऱ्याखालून 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सुरक्षा जवान बचाव आणि मदत कार्यात गुंतले आहेत. यासह सैन्याचे जवानदेखील घटनास्थळी पोहोचले असून तेही मदत कार्य करत आहेत. - मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू
30 लोक दबल्याची शक्यता : शिमलाच्या समर हिल भागात असलेले शिव बारी मंदिर भूस्खलनात दबले आहे. मंदिराच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 30 लोक दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सहायक पोलीस अधीक्षक सुनील नेगी यांनी सांगितले की, बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 15 जणांना वाचवण्यात आले आहे. सर्वांना उपचारासाठी आयजीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान भूस्खलनाची घटना घडल्याची माहिती मिळताच स्थानिक पातळीवरील बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केले आहे. ढिगाऱ्याखाली 30 जण दबल्या गेले. त्यातील 22 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा समावेश आहे. तसेच एकाच कुटुंबाच्या मालकीची दोन घरे आणि एक गोठा ढिगाऱ्याखाली दबला गेला आहे. दरम्यान,हिमाचल प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यात भूस्खलन आणि अचानक पुराच्या घटना घडत आहेत. हवामान खात्याने हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हेही वाचा-
- Gaurikund Landslide : गौरीकुंड भूस्खलनावेळी नेमके काय घडले? प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
- Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेतील रेस्क्यू ऑपरेशन अखेर थांबवले; अद्यापही 57 बेपत्ता, 27 मृत्यू