लखीमपूर खीरी - लखीमपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी आणि गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्राला आज पोलिसांसमोर हजर करण्यात आले आहे. आशिष मिश्राला 8 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार होते. परंतु तो वेळेवर न्यायालयात न पोहोचल्याने पोलिसांना बराच वेळ वाट बघावी लागली होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टानेही यूपी सरकार आणि पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अखेस आज आशिष मिश्रा पोलिसांसमोर हजर झाला आहे.
नेमकं काय घडले होते?
रविवारी दुपारच्या सुमारास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य हे लखीमपूर खिरी येथे येणार होते. मात्र, त्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी हेलिपॅडला घेराव घातला. दरम्यान, केशव मौर्य हे आपला कार्यक्रम संपवून केंद्रीय राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा तेनी यांच्या घराकडे रवाना झाले. याची माहिती मिळताच अजय कुमार यांचा मुलगा घाईघाईत घरी जायला निघाला. त्याच्या गाडीचा ताफा तिकोनिया येथील बनबीरपुर चौकात पोहोचताच तेथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी न थांबवता ती थेट शेतकऱ्यांच्या अंगावर चढवण्यात आली. हा सर्व प्रकार जाणूनबूजून करण्यात आला, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
हा सर्व प्रकार घडल्यानंतर शेतकऱ्यांनी या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसेच कारमध्ये बसलेले भाजपा कार्यकर्ता आणि आशिष मिश्रा यांना घेरले. त्यानंतर आशिष मिश्रा यांनी परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळीबार केला. या गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचाही आरोप करण्यात येत आहे. तर या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, संपूर्ण देशभरातून या घटनेचा निषेध होत आहे.
हेही वाचा -भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांकडून चोप, राज्यात शिवशाही आहे का तानाशाही? - आशिष शेलार