किलॉंग (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशच्या किलॉंगमध्ये पर्यटनासाठी आलेल्यांनी हंगामातील पहिल्या हिमवृष्टीचा आनंद लुटला. हिमाचल प्रदेशच्या अनेक पर्वतरांगा 31 ऑक्टोबरला पांढऱ्याशुभ्र बर्फाची शाल पांघरल्यासारख्या दिसत होत्या. या हंगामातील पहिल्या हिमवृष्टीमुळे किलॉंग आणि लाहोल परिसरांना गारठवून टाकले आहे. आठवड्याभरात हजारो पर्यटकांनी नव्याने तयार झालेल्या अटल टनेल आणि सिसू तलाव याठिकाणी जाऊन हिमवृष्टीचा आनंद लुटला.
कोरोना ओसरल्याने पर्यटकांची बहार
हिवाळ्याची सुरुवात होताच लाहोल येथील हॉटेलमध्ये आणि इतर निवासी व्यवस्थांमध्ये होणारी गर्दी कमी होते. मोजकेच व्यवसाय सुरू राहतात. अलीकडे कोरोनामुळे अनेक हॉटेल व्यवसाय बंद होते, अशी माहिती हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष बीर सिंग यांनी दिली. हिमवृष्टीमुळे हा परिसर पुन्हा एकदा पर्यटकांनी बहरुन गेला आहे.
नुकत्याच तयार झालेल्या अटल टनेलला भेट देण्यासाठी पंजाबहून आलेल्या पर्यटकांनी हिमवृष्टीचा मनसोक्त आनंद लुटल्याची प्रतिक्रिया दिली. टनेलला भेट देण्यासाठी पर्यटकांची वाढ झाल्याने इथल्या पर्यटन व्यावसायिकांना फायदा होत आहे.