बंगळुरू Lady CEO Killed Child : कंपनीची सीईओ असलेल्या सूचना शेठ या महिलेनं आपल्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा गोव्यातील हॉटेलमध्ये खून केल्यानं मोठी खळबळ उडाली होती. या क्रूर मातेनं गोव्यात चिमुकल्याचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह घेऊन गोव्यावरुन कर्नाटकमध्ये प्रवास केला होता. या प्रकरणी मुलाच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. डॉक्टरांनी मुलाचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाल्याचा अहवाल दिला आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर तालुका रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ कुमार नाईक यांनी हा अहवाल दिला आहे.
तोंड आणि नाक दाबल्यानं झाला मृत्यू :गोव्यातून मुलाचा मृतदेह टॅक्सीतून नेणाऱ्या या महिलेला चित्रदुर्ग जिल्ह्यात पोलिसांनी पकडलं होतं. यावेळी पोलिसांनी महिलेच्या सुटकेसची तपासणी केली असता, त्यात चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह असल्याचं आढळून आलं होतं. या प्रकरणी पोलिसानी महिलेला अटक केल्यानंतर मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी बाळाचा मृत्यू श्वास गुदमरल्यानं झाल्याचा अहवाल दिला आहे. यावेळी शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टर कुमार नाईक यांनी " तोंड आणि नाक दाबल्यामुळे मुलाचा गुदमरुन मृत्यू झाला असावा. त्यासाठी मारेकरी महिलेनं कापड किंवा उशीचा वापर केला असावा. हातानं गळा आवळून खून झाला असेल, असं वाटत नाही" असंही त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितलं.