नवी दिल्ली - भारत चीनमध्ये सीमावादावर काल (शनिवार) चर्चेची बारावी फेरी पार पडली. चिनी बाजूने असणाऱ्या सीमेवरील माल्डो या ठिकाणी कॉर्प्स कमांडर स्तरावर सुमारे 9 तास ही बैठक चालली. गलवान खोऱ्यातील सीमावाद मिटला असला तरी भारत-चीन सीमेवर अनेक ठिकाणांवरून मतभेद आहेत. गोग्रा हाईट्स, हॉट स्प्रिंग, हे भूभाग महत्त्वाचे असून पुर्व लढाखमधील सीमावाद मिटवण्यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. ही बैठक सकाळी 10: 30 वाजता सुरू झाली आणि 7: 30 वाजता संपली.
भारत-चीन सीमेवरील तणावर कमी करण्यावर नऊ तासांच्या मॅरेथॉन बैठकीत चर्चा झाली. अलीकडेच, चीनने LAC विवाद संपवण्यासाठी 26 जुलै रोजी चर्चा करण्याचे प्रस्तावित केले होते. मात्र, 26 जुलै रोजी 'कारगिल विजय दिवस' असल्याने बैठकीची तारीख 31 जुलै निश्चित करण्यात आली. भारत चीनमध्ये सीमावाद सुरू झाल्यानंतर आत्तापर्यंत लष्करी, राजनैतिक आणि विशेष प्रतिनिधी स्तरावर अनेक चर्चा झाली आहे. भारताची एक इंचही जमीन कोणालाही बळकाऊ दिली जाणार नाही, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले असून त्यानुसारच चीनसोबत सीमावादावर चर्चा सुरू आहे.
गेल्या वर्षीच्या एप्रिलपासून LAC वर दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. अनेक चर्चेनंतर परिस्थितीत थोडी सुधारणा झाली आहे. परंतु तरीही गोग्रा हाईट्स, हॉट स्प्रिंग असे अनेक मुद्दे आहेत. जेथे दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये गलवान खोऱ्यात हिंसक चकमक झाली होती. ज्यात 20 भारतीय जवान शहीद झाले होते. त्याच वेळी, अनेक चिनी सैनिकही ठार झाले. याच वेळी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी 23 जुलै रोजी अरुणाचल प्रदेशाच्या सीमेला लागून असलेल्या निंगची या तिबेटी शहराला भेट दिली होती. एका दशकात तिबेटच्या राजधानीला दिलेली ही त्यांची पहिलीच भेट होती.