श्रीनगर: सुरक्षा दलाकडून सीमेवर घुसखोरी करणाऱ्याविरोधात सातत्यानं कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईला आज मोठे यश मिळालं आहे. कारवाईत पाच दहशतवादी ठार केल्यानंतरहीकुलगाम परिसरात आणखी दहशतवादी लपले असल्याचा सुरक्षा दलाला संशय आहे. त्यामुळे सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पाच दहशतवादी ठार करण्यात आले असले तरी सुरक्षा दलाकडून कारवाई सुरुच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सीमेपलीकडून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील डीएच पोरा भागातील सामनो पॉकेटमध्ये गुरुवारी दुपारी चकमक झाली होती. दहशतवाद्यांविरुद्धच्या संयुक्त कारवाईमध्ये सैन्यदलाचे 34 राष्ट्रीय रायफल्स, 9 पॅरा (एलिट स्पेशल फोर्स युनिट), पोलीस आणि सीआरपीएफ यांचा समावेश आहे.
गुप्तचरांकडून मिळाली होती माहिती-कुलगाममधील डीएच पोरा येथे गुरुवारी संध्याकाळी सुरू झालेली चकमक रात्री थांबविण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी पुन्हा सुरक्षा दलाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली. चकमकीच्या ठिकाणाभोवती सुरक्षा दलाकडून घेरावबंदी करण्यात आली. आज पहाटेपासून अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये पुन्हा चकमक सुरू झाली. या चकमकीच्या वेळी सुरक्षा दलानं दहशतवाद्यांना पळून जाण्याची कोणतीही संधी दिली नाही. सुरक्षा दलांना या भागात दहशतवादी लपून बसल्याची गुप्तचरांकडून माहिती मिळाल्यानंतर ही चकमक सुरू झाल्याचे समजते.
यापूर्वीही सुरक्षा दलाची कारवाई-सुरक्षा दलाकडून संयुक्तपणे कारवाई करत सीमेवरील दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यात येतात. बुधवारी (15 नोव्हेंबर) सुरक्षा दलानं उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात होता. 26 ऑक्टोबर रोजी कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पोलीस आणि लष्कराने सुरू केलेल्या संयुक्त मोहिमेत घुसखोरीचा प्रयत्न यशस्वीपणे हाणून पाडण्यात आला होता. तसेच 30 ऑक्टोबर रोजी कुपवाडा जिल्ह्यात पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत घुसखोरीचा प्रयत्न फसवून एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता.
हेही वाचा-
- Israel Hamas War : हमासनं गाझातील रुग्णालयात शस्त्रं लपवली? आयडीएफचा दावा काय? वाचा सविस्तर
- Pune ISIS Module Case: पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात एनआयएला मोठं यश, आठव्या आरोपीला अटक