जयपूर :शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने कोट्यवधी रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा कोटा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्यावर देशभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल 400 गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही या भामट्यांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी दीपक नायक, गजेंद्र मीना, अनिरुद्ध यादव, राजा अय्यर आणि सलमान खान या पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी बनावट अॅप :पकडण्यात आलेल्या आरोपींनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली मॅक्सिन हे बनावट अॅप बनवले होते. या अॅपच्या माध्यमातून देशभरातील नागरिक यामध्ये पैसे गुंतवत होते. त्याचा वापर हे भामटे शेअर मार्केटमध्ये करत नव्हते. नागरिकांना थापा देऊन हे भामटे पैसे त्यांच्या खात्यात टाकून हडप करायचे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कोटा शहरातील महावीर नगर भागातील कॉम्पिटिशन कॉलनीतील रहिवासी दीपक नायक, कैथून रामराजपुरा येथील रहिवासी गजेंद्र मीना, कैथून येथील मानस गावचा रहिवासी अनिरुद्ध यादव, अमरकतला येथील रहिवासी राजा अय्यर, बुंदी शहर आणि सलमान खान, विजय नगर चंदा कॉलनी, अजमेर येथील रहिवासी असल्याची माहिती कोटा शहर पोलीस अधीक्षक शरद चौधरी यांनी दिली. या प्रकरणात आंतरराज्य ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीत सहभागी असलेल्या अन्य आरोपींनाही अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.
मॅक्सिन अॅपवर दिले अनेक टास्क :बलिता रोड येथील रहिवासी मयंक नामा यांनी कोटा शहरातील कुन्हडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत काही आरोपींनी मॅक्सिन अॅपची लिंक पाठवल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले होते. हे अॅप डाउनलोड करून सदस्यत्व घेण्याचे काम त्यांना दिले होते. अॅप डाऊनलोड करुन त्यांना प्रत्येकाकडून 50 रुपये देण्यास सांगितले. यानंतर मॅक्सिन अॅपवर अनेक टास्क देऊन 1000 ते 6 लाख 80 हजार रुपये घेतल्याचा त्यांनी आरोप केला आहे. त्यामध्ये गुंतवणुकीवर भरघोस नफा कमावण्याच्या बहाण्याने तक्रारदाराकडून 6 लाख 74 हजार 280 रुपये ऑनलाइन बनावट खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.