कोलकाता : संध्याकाळ झाली की संपूर्ण कोलकाता शहर दिव्यांच्या उजेडाने उजळून निघते. मात्र शहराच्या दक्षिणेला असलेल्या ब्रह्मपूरमध्ये असलेल्या सकिना शेखचे घर इतके दिवस अंधारातच होते. गारियातील ब्रह्मपूर येथील शेख कुटुंब 36 वर्षे वीजेविना जगत होते. शेवटी आत्ता त्यांना एकदाचे वीज कनेक्शन मिळाले. इतक्या दिवसांनी वीज मिळाल्याने शेख यांचे सर्व कुटुंब आनंदित झाले आहे. (Family gets electricity connection after 36 years). (Kolkata Family gets electricity connection).
दैनंदिन कामांसाठी शेजाऱ्यांवर अवलंबून : कोलकात्याच्या कडाक्याच्या उन्हात पंख्याखाली किंवा एअर कंडिशनरखाली बसून आराम मिळावा म्हणून अशी एकच आशा या असहाय कुटुंबाची होती. शेख कुटुंबीय त्यांच्या माफक आर्थिक पार्श्वभूमीमुळे टी.व्ही पाहण्यासाठी किंवा मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी देखील शेजाऱ्यांवर अवलंबून होते. वीज जोडणी घेण्यासाठी लागणारी रक्कमही या कुटुंबाला भरता आली नाही. त्यामुळे शेख कुटुंबीयांनी वर्षानुवर्षे आपले आयुष्य अंधारात काढले.
ऊर्जामंत्र्यांनी घेतली दखल : राज्यमंत्री अरूप बिस्वास यांच्या मदतीने शुक्रवारी ब्रह्मपूर येथील शेख कुटुंबीयांच्या घरी वीज जोडणी आली. कोलकाता नगरपालिकेच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 111 च्या ब्रह्मपूर जी ब्लॉकमध्ये त्यांचे घर उजळल्यानंतर घरातील सदस्यांनी आनंद व्यक्त केला. कोलकात्याला लागून असलेल्या या भागात अलीकडच्या काळात विकासाची छटा दिसते आहे. सकीना शेख यांची मुलगी आणि जावईही त्यांच्यासोबत राहतात. काही दिवसांपूर्वी टोलीगंजचे आमदार आणि राज्याचे ऊर्जामंत्री अरूप बिस्वास यांनी ब्रह्मपूरला भेट देऊन सकीनाची असहायता पाहिली होती. कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या अखत्यारीतील अशा प्रकरणामुळे बिस्वास यांना धक्का बसला आणि त्यांनी लगेच कारवाई केली. कुटुंबाला वीज जोडणी देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.