महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात.. - vitthal darshan free

कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या दिल्लीमधील शेतकरी आंदोलनांबाबत सर्वोच्च न्यायालय आज निकाल जाहीर करणार आहे. कोविशील्ड लशीचे हे डोस देशभरातील 13 शहरांमध्ये लसीचे हे डोस पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे.

आजच्या घडामोडी
आजच्या घडामोडी

By

Published : Jan 12, 2021, 7:06 AM IST

मुंबई - सिरमची लस आज देशातील १३ शहरात पोहोचणार आहे. तर दुसरीकडे कृषी कायद्याबाबतही सर्वोच्च न्यायालय आज निर्णय घेणार आहे. अशा महत्त्वाच्या १० घडामोडी दिवसभरात घडणार आहेत.

  1. नव्या कृषी कायद्यावर सर्वोच्च न्यायालय देणार निकाल

नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या दिल्लीमधील शेतकरी आंदोलनांबाबत सर्वोच्च न्यायालय आज निकाल जाहीर करणार आहे. यावेळी निकाल देण्यासोबतच हा वाद मिटवण्यासाठी एका समितीची घोषणाही सर्वोच्च न्यायालय करु शकते.कृषी कायदे लागू झाल्यापासून त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. त्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. १५ जानेवारीला होणाऱ्या शेतकरी व सरकार दरम्यान होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी महत्त्वाची ठरली.

2. सिरममधून कोरोनाची लस देशातील १३ शहरांमध्ये पोहोचणार

पुणे-जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना रोगावर भारतातील पहिल्या 'कोवीशिल्ड' लसीचे डोस आज पहाटे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास विमानतळाकडे रवाना झाले. त्यामुळे देशातील नागरिकांना कोरोनाची लस मिळण्याची प्रतिक्षा जवळपास संपली आहे. आज पहाटेच्या सुमारास तीन कंटेनरमधून विमानतळाच्या दिशेने नेण्यात आले. कोविशील्ड लशीचे हे डोस देशभरातील 13 शहरांमध्ये लसीचे हे डोस पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे.

सिरम

3. जिजाऊ जन्मोत्सव' सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुकवर लाईव्ह

बुलडाणा- मराठा सेवा संघाच्यावतीने 12 जानेवारीला दरवर्षी आयोजित करण्यात होणारा 'माँ जिजाऊ जन्मोत्सव' सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला. हा जन्मोत्सव सोहळा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीकोनातून उत्कृष्ट काम करणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा मराठा सेवा संघाच्यावतीने 'मराठा विश्वभूषण पुरस्कार' देऊन गौरव करण्यात येणार आहे.

4. शिवसेना नेते सूर्यकांत महाडिक यांच्यावर रत्नागिरीत अंत्यसंस्कार

मुंबई-शिवसेना उपनेते व भारतीय कामगार सेनेचे नेते सुर्यकांत महाडिक यांचे अल्पशा आजाराने सोमवारी रात्री साडेआठ वाजता निधन झाले. चेंबूर येथे सकाळी सात ते दहा अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे. अंतिमसंस्कार त्यांच्या मूळगावी रत्नागिरी येथे करण्यात येणार आहेत.

सुर्यकांत महाडिक

5. मुदत वाढल्यामुळे आजपासून २५ जानेवारीपर्यंत भरता येणार अर्ज

मुंबई-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुधारित वेळापत्रक प्रमाणे २५ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. यापूर्वीची मुदत सोमवारी ११ जानेवारी रोजी संपत होती.

परीक्षा

6. ऑनलाईन पास नसतानाही भाविकांनी आजपासून ८ हजार भाविकांना दर्शन

सोलापूर- श्री. विठ्ठल दर्शनासाठी ऑनलाइन पासची सक्ती प्रशासनाने केली होती. आता या पासवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने पासची सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, आता विठ्ठल भक्तांना पास न घेता विठ्ठलाचे दर्शन करता येणार आहे. आठ हजार भाविकांना मुखदर्शन घेता येणार आहे.कोरोनामुळे 17 मार्चपासून राज्यातील इतर मंदिरांप्रमाणे पांडुरंगाचे मंदिरही नऊ महिने बंद ठेवण्यात आले होते. दिवाळी पाडव्यापासून कोरोनाचे सर्व नियम पाळून ऑनलाइन पासद्वारे श्री. विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या मुखदर्शनाची सोय मंदिर समितीकडून करण्यात आली होती. आधी तीन हजार भाविकांना मुखदर्शनाची परवानगी देण्यात आली. त्यानंतर ती पाच हजार करण्यात आली. मात्र, उद्यापासून दररोज आठ हजार भाविकांना विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेण्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे.

7.ओप्पोच्या सेलची आज शेवटची तारीख

नवी दिल्ली - तुम्हाला नवीन वर्षात स्वस्तात फोन खरेदी करण्याची संधी आहे. ८ जानेवारी पासून Amazon Oppo Fantastic Days सेलचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेल १२ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजे सेलचा आजचा शेवटचा दिवस तुम्हाला मिळणार आहे.सेलमध्ये विविध बँकांच्या कार्डवरून शॉपिंग केल्यास १० टक्के सवलतदेखील मिळणार आहे.

ओप्पो

8. राज्यात आठवडाभर युवा स्पताह

मुंबई-स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित राज्यात १२ जानेवारीपासून युवा सप्ताह करण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंद यांचे कार्य, तत्त्वज्ञान व विचार याबाबत युवांचे प्रबोधन, युवाबाबत उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती, युवक, युवतींचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच १५ ते २० वर्षे मुले-मुली आणि २० वर्षांवरील ते २९ वर्षांखालील युवक व युवती अशा दोन गटात विज्ञान-तंत्रज्ञान, प्रगती, समाजसेवा उपाय, युवापुढील आव्हाने, नैसर्गिक साधन संपत्ती जतन करण्याकरिता युवांची भूमिका, स्वच्छता अभियान आदी विषयांवर जिल्हास्तरावर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे.

स्वामी विवेकानंद

9. आरआरबीचे हॉलतिकीट आजपासून उपलब्ध

मुंबई-रेल्वे भरती बोर्डाच्या (RRB) नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी परीक्षेच्या पहिल्या टप्प्यातील दुसरी फेरी सुरू होत आहे. यासंबंधी आरआरबीने परिपत्रकही जारी केले आहे. यानुसार, आरआरबी एनटीपीसी परीक्षा सीबीटी-१ चा दुसरा टप्पा १६ जानेवारी २०२१ पासून सुरू होणार आहे. या परीक्षेचे हॉलतिकीट आजपासून आरआरबी वेबसाईटवर मिळणार आहे. उमेदवारांना आपल्या रिजनल वेबसाइटवर जाऊन अॅडमिट कार्ड मिळवणे शक्य होणार आहे. हॉलतिकीट नसेल तर विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही.

रेल्वे

10.हॉस्टेल डेज आज होणार प्रदर्शित

लेखक, संगीत दिग्दर्शक आणि दिग्दर्शक अजय नाईक हे ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहेत. हा सिनेमा १२ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर, विराजस कुलकर्णी, अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. या चित्रपटात चिन्मय पटवर्धन, सागरिका रुकरी, पूर्वा देशपांडे, पूर्वा शिंदे, अंकिता लांडे आणि गणेश बिरंगल यांचा त्यात समावेश आहे. चित्रपटाची प्रस्तुती श्री पार्श्व प्रॉडक्शन्स आणि ट्वेण्टी फोर स्टुडिओ यांनी केली आहे. ‘हॉस्टेल डेज’ची कथा हेच बदल अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने, विनोदी अंगाने आणि सकारात्मकरित्या मांडते.

होस्टेल डेज

ABOUT THE AUTHOR

...view details