हैदराबाद-कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्रवास करावा लागला तरी घाबरू नका. कारण, तुम्ही नियमांचे पालन करून व काही चाचण्यांचे रिपोर्ट जवळ ठेवून प्रवास करू शकता. त्यासाठी विविध राज्यांनी वेगवेगळे नियम केले आहे. तर काही राज्यांनी अद्यापही प्रवाशांना निर्बंध लागू केलेले नाहीत. तर काही राज्यांनी कोरोना चाचणीचे अहवाल बंधनकारक केले आहेत. त्याविषयी जाणून घेऊ.
केरळ-
पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था असलेल्या केरळने अद्याप प्रवाशांना कोणतेही निर्बंध लागू केले नाहीत. मात्र, केरळमध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला कोव्हिड पोर्टलवर नोंदणी करावी लागते. त्यानंतर ई-पास दिला जातो. केरळमध्ये जाणाऱ्या नागरिकांना सात दिवसांचे आयसोलेशन बंधनकारक आहे. तर आठव्या दिवसी आरटीपीसीआर टेस्टही बंधनकारक आहे. पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्यावर उपचारही घ्यावे लागतात. ज्यांच्याजवळ अहवाल नाहीत, त्यांना 14 दिवसांचे आयसोलेशन बंधनकारक आहे. उद्योग आणि इतर कामांसाठी येणाऱ्या प्रवाशांना नियमात सवलत देण्यात आली आहे. त्यांना कोव्हिड चाचणी बंधनकारक नाही. मात्र, त्यांना सात दिवसानंतर केरळमधून बाहेर जावे लागणार आहे. असे असले तरी कोव्हिड पोर्टलवर नोंदणी या प्रवाशांना बंधनकार आहे. केरळमध्ये जाणाऱ्या नागरिकांसाठी कोरोना अहवाल निगेटिव्ह असण्याची अट नाही. मात्र, हा अहवाल जवळ बाळगावा, असा सल्ला केरळच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात येतो. विमानाने आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना आरटी-पीसीआर टेस्ट आवश्यक आहे. तसेच आयसोलेशनही बंधनकारक आहे.
कर्नाटक-
कर्नाटकमध्ये इतर राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर टेस्ट ही निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. हा रिपोर्ट प्रवासापूर्वी तीन दिवसांमधील असावा, अशी अट आहे. आपत्कालीन स्थितीत मात्र प्रवाशांना नियमात सूट आहे. राज्याच्या सर्व सीमा, रेल्वे आणि विमानतळावर स्वॅब चाचणी करण्यात येते. देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आयसोलेशन बंधनकारक नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय विमान प्रवास केल्यास आरोग्याची चाचणी बंधनकारक आहे. एअर सुविधा पोर्टलवर प्रवाशांना कोरोनाची चाचणी निगेटिव्ह सबमिट करावी लागते. हा रिपोर्ट प्रवासापूर्वीच्या तीन दिवसांमधील असावा लागतो. या प्रवाशांना 14 दिवसांचे आयसोलेशन आवश्यक आहे.
हेही वाचा-ब्रेक द चेन; 'या' सहा राज्यांतून रेल्वेने येणाऱ्यांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक
तामिळनाडू
दुसऱ्या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी तामिळनाडू सरकारने ई-पास बंधनकारक केला आहे. जर तामिळनाडूमध्ये तीन दिवसांपर्यंत राहणार असाल तर आरटीपीसीआर टेस्ट करण्याची गरज नाही. मात्र, तीन दिवसांहून अधिक मुक्काम असेल तर आरटी-पीसीआर चाचणी करावी लागते. दुसऱ्या राज्यांमधून तामिळनाडूमध्ये येणाऱ्या वाहनांवर कोणतेही निर्बंध नाहीत. राज्यांच्या सीमांवर कोणतेही वैद्यकीय चाचणी अथवा कोणताही रिपोर्ट मागितला जात नाही.
हेही वाचा-विना मास्क फिरणाऱ्या लोकलमधील प्रवाशांकडून 8 लाख 92 हजारांचा दंड वसूल
आंध्र प्रदेश-
कर्नाटक, तामिळनाडू व ओडिशा सीमांवर जाणे-येणे यासाठी निर्बंध नाहीत. ओडिशाने आंध्र प्रदेशमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी वैद्यकीय चाचणी बंधनकारक केली आहे.
तेलंगाना
सीमांवर थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक आहे. आदिलाबाद, आसिफाबाद, निर्मल, मंचेरियल, निजामाबाद, कामरेड्डी येथे विशेष सतर्कता घेतली जात आहे. या जिल्ह्यांच्या सीमा महाराष्ट्राशी आहेत. कर्नाटकशेजारी असलेल्या संगारेड्डी आणि महबूबनगर येथील चेक पाँईट्समध्येही विशेष काळजी घेतली जात आहे. ज्यांना सर्दी, ताप आहे, त्यांना राज्यात प्रवेश दिला जात नाही.
महाराष्ट्र-
महाराष्ट्रात कार, बस आणि विमानाने येणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही चाचण्यांचे अहवाल देण्याची गरज नाही. मात्र, सहा राज्यांतून रेल्वेमार्गे येणाऱ्या प्रवाशांना तीन दिवसांत आरटी-पीसीआर टेस्ट करणे बंधनकारक आहे. केरळ, गोवा, राजस्थान, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंड हे संवदेशनशील राज्ये आहेत. या राज्यांमधून महाराष्ट्रात रेल्वेने येणाऱ्या नागरिकांना प्रवासापासून ४८ तासांत आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक आहे. औरंगाबाद आणि जळगाव जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात येणाऱ्यांना कोरोनाची निगेटिव्ह चाचणी बंधनकारक केली आहे. महाराष्ट्राला लागून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगाना, कर्नाटक आणि गोव्याच्या सीमा आहेत. गुजरातने महाराष्ट्रामधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. कुंभमेळ्यांवरून येणाऱ्या यात्रेकरूंनाही आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक आहे.
हेही वाचा-कोरोनाचा खोटा अहवाल घेऊन विमान प्रवासाचा प्रयत्न, ३ व्यक्तींवर एफआयआर दाखल