नवी दिल्ली - महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी 26 जानेवारीला ट्रॅक्टर मार्च काढण्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार आहे. अशा महत्त्वाच्या घटनांचा घेतलेला हा वेध आहे.
1. ग्रामपंचायत निवडणूक निकाल आज होणार जाहीर
मुंबई-राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. गावा-गावात या निकालांची उत्सुकता शिगेला पोहचली असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2. किसान महिला दिवस संयुक्त किसान मोर्चाकडून होणार साजरा
दिल्ली- दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आणखी निर्णायक टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर 23 ते 26 जानेवारी या कालावधीत सर्व राज्यांच्या राजधानीत राजभवनांवर आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच 18 जानेवारीला किसान महिला दिवस देशभर साजरा शेतकरी संघटनांकडून आज करण्यात येणार आहे.
3- चिकलठाण्यातील धावपट्टीच्या रुंदीकरणाची तयारी
औरंगाबाद - चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार लवकरच होणार आहे. त्याबाबतचा 182 एकर भूसंपादनाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे. त्यासाठी 18 जानेवारीपासून धावपट्टी रुंदीकरणास भूसंपादनासाठी संयुक्त मोजणी होणार आहे.
4. नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या कोठडीचा आज शेवटचा दिवस
मुंबई -अमली पदार्थ तस्करी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता समीर खान याला 18 जानेवारीपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक यांचे जावई असलेले समीर यांच्याबाबत पोलीस न्यायालयात काय भूमिका घेतात, हे आज स्पष्ट होणार आहे.
5. सुरक्षा सप्ताहाचे मुख्यमंत्री करणार उद्घाटन
मुंबई - केंद्राने राज्यात 32 वा रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान महिनाभर राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे राज्यात यंदा पंधरवडाऐवजी सुरक्षा सप्ताह महिनाभर चालणार आहे. या अभियानाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उद्घाटन करणार आहेत. वाहनांच्या अपघातात आणि त्यामधून होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते.
6- आरोग्य विभागातील साडेआठ हजार जागांसाठी निघणार जाहिरात
मुंबई- 6 राज्याच्या आरोग्य विभागाकडून लवकरच एकूण 17 हजार पदांची भरती केली जणार आहे. पहिल्या टप्प्यात 8 हजार 500 पदांची जाहिरात आज प्रसिद्ध होणार आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणेत मनुष्यबळ कमी असल्याची वस्तुस्थिती समोर आली होती.
7. एसटीचीही राज्यभर सुरक्षित मोहिम-
मुंबई -राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे निर्देशानुसार एसटी महामंडळ आजपासून सप्ताहभर सुरक्षित मोहिम राबविणार आहे. एसटी महामंडळामध्ये दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात सुरक्षितता मोहिम घेण्यात येते. यामध्ये वाहनांची देखभाल-दुरुस्ती, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आदींचा समावेश करण्यात येतो.
8-गुजरातमध्ये मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी भूमीपुजन
अहमदाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद मेट्रो योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे तसेच सुरत मेट्रो योजनेसाठी आज भूमीपूजन करणार आहेत. या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप सिंह पुरीदेखील उपस्थित राहणार आहे. दोन्ही मेट्रो रेल्वेसाठी 12020.32 कोटी रुपये खर्च येणार आहे.
संग्रहित - मेट्रो उद्घाटन 9. ओप्पोचा भारतात 5 जी स्मार्टफोन होणार लाँच
नवी दिल्ली- ओप्पो ही चिनी स्मार्टफोन कंपनी आज भारतीय बाजारपेठेत 'रेनो 5 प्रो 5 जी मॉडेल लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ५ जी तंत्रज्ञानाची संपर्कयंत्रणा आहे. हे मॉडेल गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच झाले होते. 8 जीबी रॅम 128 जीबी स्मार्टफोनची चीनमधील किंमत 3399 चायनीज युआन (38 हजार 200 रुपये) इतकी आहे. 12 जीबी रॅम 256 जीबी मॉडेलची किंमत 3799 चायनीज युआन (42 हजार 700 रुपये) इतकी आहे.
10. ट्रॅक्टर मार्चवर सर्वोच्च न्यायालय घेणार सुनावणी-
नवी दिल्ली- दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी प्रजासत्ताक दिनाला ट्रॅक्टर मार्च दिल्लीत काढण्याचा इशारा दिला आहे. या मोर्चाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठ निर्णय घेणार आहे.