महाराष्ट्र

maharashtra

Indian Citizenship Gave Up : 2022 मध्ये इतक्या लोकांनी सोडले भारताचे नागरिकत्व, जाणून घ्या 10 वर्षांतील आकडेवारी

By

Published : Feb 10, 2023, 7:50 AM IST

2022 मध्ये 2 लाखांहून अधिक भारतीयांनी नागरिकत्व सोडले. 2011 पासून नागरिकत्वाचा त्याग केलेल्या भारतीयांची एकूण संख्या 16,63,440 आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.

passport
पासपोर्ट

नवी दिल्ली : 2011 पासून 16 लाखांहून अधिक भारतीयांनी त्यांचे भारतीय नागरिकत्व सोडले आहे. गेल्या वर्षी 2,25,620 जणांनी भारतीय नागरिकत्व सोडले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत दरवर्षी नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या भारतीयांच्या संख्येबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही आकडेवारी जाहीर केली आहे.

सविस्तर आकडेवारी : जयशंकर म्हणाले की, 2015 मध्ये भारतीय नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या भारतीयांची संख्या 1,31,489, 2016 मध्ये 1,41,603 आणि 2017 मध्ये 1,33,049 होती. 2018 मध्ये ही संख्या 1,34,561, 2019 मध्ये 1,44,017, 2020 मध्ये 85,256, 2021 मध्ये 1,63,370 आणि 2022 मध्ये 2,25,620 होती. 2011 च्या आकडेवारीनुसार 1,22,819, 2012 मध्ये 1,20,923, 2013 मध्ये 1,31,405 आणि 2014 मध्ये 1,29,328 होते. 2011 पासून नागरिकत्वाचा त्याग केलेल्या भारतीयांची एकूण संख्या 16,63,440 आहे. ते म्हणाले की, गेल्या तीन वर्षात पाच भारतीय नागरिकांना संयुक्त अरब अमिरातीचे नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. जयशंकर यांनी 135 देशांची यादी देखील दिली आहे जिथे भारतीयांचे नागरिकत्व आहे.

अमेरिकन कंपन्यांची नोकरकपात : दुसर्‍या एका प्रश्नाला उत्तर देताना, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन म्हणाले की, अलिकडच्या काही महिन्यांत अमेरिकन कंपन्यांनी केलेल्या व्यावसायिकांच्या छाटणीची सरकारला जाणीव आहे. यापैकी काही H-1B आणि L1 व्हिसावर असलेले भारतीय नागरिक असू शकतात. भारत सरकारने आयटी व्यावसायिकांसह उच्च कुशल कामगारांच्या हालचालींशी संबंधित मुद्दे अमेरिकन सरकारकडे सातत्याने मांडले आहेत.

हेन्ले पासपोर्ट इंडेक्स : हेन्ले पासपोर्ट इंडेक्सच्या नवीन रँकिंगनुसार जपानचा पासपोर्ट हा जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे. याचाच अर्थ जपानी नागरिक जगातील 193 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करू शकतात. जपानने या यादीत अव्वल स्थान पटकावण्याचे हे सलग पाचवे वर्ष आहे. या यादीत भारताचा क्रमांक 85 वा आहे. भारतीयांना आता 59 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश मिळणार आहे. तर भारताचा शेजारी देश पाकिस्तानचा क्रमांक 106 वा आहे. हेन्ले पासपोर्ट इंडेक्स जगातील पासपोर्टची ताकद दर्शवतो. या निर्देशांकाला जगातील सर्व पासपोर्टचे अधिकृत मानांकन मानले जाते. यामध्ये 199 देशांच्या पासपोर्टचा समावेश करण्यात आला आहे. पासपोर्ट इंडेक्स म्हणजे एखाद्या देशाचा पासपोर्ट जागतिक पातळीवर किती मजबूत किंवा किती कमकुवत आहे, याचे प्रमाण.

हेही वाचा :Henley Passport Index 2023 : जपानचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली, भारताचा क्रमांक 85 वा ; जाणून घ्या पासपोर्ट इंडेक्स म्हणजे काय?

ABOUT THE AUTHOR

...view details