हैदराबाद - प्राप्तिकर विभागाचे छापे पडल्याची तुम्ही अनेकदा बातमी वाचली असेल. पण, प्राप्तिकर विभागाला छापे टाकण्याचे किती अधिकार आहेत? छापेमारीत काय होते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला बहुतेक माहित नसतात. जाणून घेऊ, त्याविषयी माहिती.
कशामुळे व कोणाच्या आदेशाने प्राप्तिकर विभाग छाप टाकते?
प्राप्तिकर विभाग, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ आणि सक्त अंमलबजावणी संचालनालय (ED) हे विभाग वित्त मंत्रालयाच्या अखत्यारित येतात. या संस्थांकडून प्राप्तिकर न भरणारे, करचोरी करणारे आणि विदेशातून आर्थिक देवाण-घेवाणीच्या नियमांचे उल्लंघन करण्यावर नजर ठेवली जाते. हा विभाग करचोरी करणारे लोक आणि संस्थांची यादी तयार करते. त्यांच्या हालचालींवर सतत नजर ठेवते. अनेक संस्था, कंपनी अथवा व्यक्तींवर काळा पैसा साठविल्याचा आरोप होते. करचोरीबाबत प्राप्तिकर विभाग आणि इतर संस्थांकडून माहिती नियमितपणे माहिती घेतली जाते. त्यानंतर माहितीची पडताळणी करून संबंधित व्यक्ती आणि कंपनीचे घर, कार्यालय, गोदाम आणि शोरुम अशा ठिकाणी छापे मारले जातात. छापे मारण्यापूर्वी प्राप्तिकर विभागाच्या आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते. छापा मारताना टीममध्ये एक वरिष्ठ अधिकारी असतो.
छापेमारीत काय होते?
ज्यावेळी कर चोरी करणाऱ्याला काहीही माहिती नसते, अशावेळी प्राप्तिकर विभागाचा छापा पडतो. या छाप्यात निवडक अधिकारी असतात. त्यामुळे छापेमारीची माहिती गोपनीय राहते. छापेमारी शक्यतो सकाळी किंवा रात्री उशीरा होते. त्यामुळे कर चोरी करणाऱ्या व्यक्तीला फारशा हालचाली करण्याची संधी मिळत नाही. छापा टाकण्यासाठी आलेल्या प्राप्तिकर विभागाच्या टीमकडे वॉरंट असते. या वॉरंटमुळे कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि परिसरात तपासणी करण्याचे अधिकार मिळतात.
वॉरंटमुळे घर, कार्यालय व गोदाम या ठिकाणी प्राप्तिकर विभागाच्या टीमला विरोध करता येत नाही. छाप्यादरम्यान, अधिकाऱ्यांसमवेत पोलीस असतात. छापेमारी कधी कधी तासांपासून काही दिवस चालते. छापेदरम्यान, कोणत्याही व्यक्तीला घर किंवा कार्यालयामधून बाहेर जाण्याची परवानगी दिली जात नाही. तसेच मोबाईल जप्त केले जातात. लँडलाईनचे कनेक्शन तोडले जाते.