हैदराबाद :चहा एके चहा, त्याची चव घेऊन पाहा; असं म्हणतात ते काही उगाच नाही. पृथ्वीतलावरील कित्येक लोक असे आहेत, ज्यांचा चहाच्या कपाशिवाय दिवसही सुरू होत नाही. कित्येक लोक तर तिन्ही त्रिकाळ चहा पिऊ शकतात, तर अनेकांना जेवणानंतरही चहा हवा असतो. पार्लेजी बिस्किट तर चहाशिवाय जणू व्यर्थच! आज या चहाचे एवढे गुणगाण गायचे कारण म्हणजे, आजचा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून ओळखला जातो.
चहाचा शोध हा पाच हजार वर्षांहूनही अगोदर लागल्याचे सांगण्यात येते. चहाची शेती आणि व्यापार यावर आज १३ दशलक्षहून अधिक लोकांची उपजीविका चालते. आपण दररोज पिणाऱ्या या चहाबद्दल या विशेष गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
- जगातील सर्वात जुन्या पेयपदार्थांमध्ये चहाचा समावेश होतो.
- पाण्यानंतर जगात सर्वाधिक चहाच पिला जातो. (मद्य नाही!)
- जगातील ६० टक्के चहा हा छोट्या मळ्यांमध्ये उगवला जातो.
- जगभरातील चहाची उलाढाल ही १७ कोटी डॉलर्सहून अधिक आहे.
- चहाच्या चार प्रमुख उत्पादक देशांमध्ये चीन, भारत, श्रीलंका आणि केनियाचा समावेश होतो. या देशांमधील ९० लाख शेतकऱ्यांना यामुळे रोजगार मिळतो.
- गेल्या दहा वर्षांमध्ये चहाच्या प्रति व्यक्ती विक्रीमध्ये दरवर्षी २.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.