महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतातील अशी ठिकाणं ज्यासमोर 'मालदीव'ही ठरेल फिकं - रामेश्वरम

India Maldives Row : सध्या देशात मालदीव विरुद्ध भारत वाद बघायला मिळतोय. यावरुनच समुद्रकिनारा असणारी भारतातील पर्यटनस्थळं पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. याच पार्श्वभूमीवर आपण समुद्रकिनारे असणाऱ्या भारतातील काही ठिकाणांबद्दल जाणून घेऊया.

Know about places in India that are more beautiful than Maldives
भारतातील अशी ठिकाणं ज्यासमोर 'मालदीव'ही ठरंल फिकं

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 12:24 PM IST

हैदराबाद India Maldives Row :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली होती. तसंच त्यांनी तेथील सुंदर समुद्रकिनाऱ्यावरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यावरुन मालदीव सरकारमधील काही नेत्यांनी पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवत भारतीयांबद्दल द्वेषपूर्ण आणि वर्णभेदाच्या कमेंट्स केल्या. मालदीवच्या मंत्र्यांनी भारतासंदर्भात केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरुन भारतीय संतप्त झाले आहेत. तसंच या प्रकरणी सर्व स्तरावरुन प्रतिक्रिया उमटत असून या वादावरुन अनेक दिग्गजांनी मालदीव ऐवजी भारतातील लक्षद्वीप अथवा सिंधुदुर्गला जाण्याचं आवाहन पर्यटकांना केलं. याच पार्श्वभूमीवर आपण भारतातील अशा पर्यटनस्थळांविषयी जाणून घेऊया ज्यासमोर 'मालदीव'ही फिकं दिसेल.

लक्षद्वीप : लक्षद्वीप हा भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश असून भारताच्या दक्षिण पश्चिम किनारपट्टीवरुन लक्षद्वीप हे 200 ते 440 किमी दूर आहे. हा एकूण 36 लहान लहान बेटांचा समूह आहे. अरबी समुद्रातील ही बेटं, विशेषतः खजूर आणि नारळाच्या झाडांसाठी ओळखली जातात. 36 बेटांपैकी भारतीय पर्यटकांना 6 बेटांवर तर बाहेरील पर्यटकांना 2 बेटांना भेट देण्याची परवानगी आहे. सागरी संग्रहालय, उजरा मशीद, मिनिकॉय इत्यादी पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू आहेत.

सिंधुदुर्ग :गोव्याच्या अगदी जवळ असलेला सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी आणि समुद्रकिनाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येथे येतात. सिंधुदुर्ग हे शांत आणि सुंदर समुद्रकिनारे, मंदिरं, ऐतिहासिक किल्ले आणि दशावतार, चित्रकथी, पांगुळ, कीर्तन, धनगिरी नृत्यासारख्या लोककला प्रकारांसाठी प्रसिद्ध आहे.

आरेवारे बीच :रत्नागिरी जिल्ह्यात स्थित असलेला आरेवारे बीच हे समुद्रकिनाऱ्याची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. स्वच्छ निळं पाणी, लांबलचक मऊ सोनेरी वाळू अन् हिरवागार परिसर यामुळं ही जागा आरामशीर सुट्ट्यांसाठी परफेक्ट आहे.

मुनरो बेट :हे बेट केरळमधील कोल्लमपासून 27 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचं दुसरं नाव 'मुनरो थुरुथु' असं आहे. मुनरो थुरुथु हे 8 बेटांनी तयार झालेलं एक बेट आहे. मुनरो बेट हे अष्टमुडी बॅकवॉटर आणि कल्लाडा नदीच्या मुख्य बिंदूवर वसलंय. तसंच या बेटाच्या नावाबद्दल सांगायचे तर, हे ठिकाण ब्रिटिश अधिकारी कर्नल जॉन मुनरो यांच्या नावावरून ओळखलं जातं. ऐतिहासिक ठिकाणांची आवड असलेल्यांना हे ठिकाण नक्कीच आवडेल.

माजुली बेट : माजुली बेट हे ब्रह्मपुत्रा नदीचा एक भाग म्हणून ओळखले जाते. तुम्हाला वेगवेगळ्या संस्कृतींविषयी जाणून घेण्याची आवड असेल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य आहे. इथं गेल्यानंतर तुम्हाला आसामची संस्कृती जवळून जाणून घेता येईल. याशिवाय इथं ईशान्य भागातील काही स्वादिष्ट पदार्थही चाखायला मिळतील.

हॅवलॉक बेट :हनिमून डेस्टिनेशन तसंच हंगामी सुट्टीसाठी हे बेट प्रसिद्ध आहे. ब्रिटिश जनरल हेन्री हॅवलॉक यांच्या नावावरून या बेटाला नाव देण्यात आलं आहे. हॅवलॉक बेट हे पोर्ट ब्लेअरपासून 55 किलोमीटर अंतरावर असून येथील खास ठिकाणांमध्ये पांढरी वाळू असणाऱ्या राधा नगर बीचचा आणि एलिफंट बीचचा समावेश आहे. येथे तुम्ही स्वादिष्ट सीफूडचा आनंद घेऊ शकता.

अलिबाग :अलिबाग बीच हा मुंबईपासून 30 किमी अंतरावर आहे. समुद्रकिनारा, स्वच्छ वाळू आणि उथळ पाण्यासाठी अलिबागची ओळख आहे. तसंच समुद्रकिनाऱ्या व्यतिरिक्त, या परिसरात कुलाबा किल्ला, अलिबाग बीच आणि उंढेरी किल्ला यासह इतर अनेक आकर्षणे आहेत. हे ठिकाण त्याच्या सीफूड आणि स्थानिक खाद्यपदार्थांसाठी देखील ओळखलं जातं.

वेलास बीच :वेलास बीच हे महाराष्ट्र राज्यातील भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेलं एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण हिरवागार परिसर, स्वच्छ पाणी आणि मुबलक सागरी जीवनासाठी प्रसिद्ध आहे. तसंच हा समुद्रकिनारा त्याच्या प्रसिद्ध कासव महोत्सवासाठी देखील ओळखला जातो. दरवर्षी या महोत्सवादरम्यान येथे पर्यटकांची गर्दी असते.

रामेश्वरम :रामेश्वरम हे बेट चेन्नईपासून 425 मैल दक्षिण-पूर्वेला आहे. त्याच्या सभोवताली हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर आहे. प्राचीन काळी हे बेट थेट भारताशी जोडलेलं होतं. नंतर, हळूहळू समुद्राच्या मजबूत लाटांनी हा भाग कापला गेला. ज्यामुळं हे बेट तयार झालं आणि चारही बाजूंनी पाण्यानं वेढलं गेलं. त्यानंतर ब्रिटिशांनी एका जर्मन अभियंत्याच्या मदतीनं रामेश्वरमला जोडण्यासाठी रेल्वे पूल बांधला. इतिहासाची आवड असणाऱ्यांमध्ये हे ठिकाण लोकप्रिय आहे.

हेही वाचा -

  1. पर्यटकांचे लक्ष वेधणारे पर्यटनस्थळ, थेवारम मेट्टु !
  2. Lord Shiva Third Eye: भगवान महाकालच्या उज्जैनमध्ये दिसला शिव शंकराचा तिसरा डोळा.. तुम्ही पाहिलाय का?
  3. कन्नौजमधील आजीबाईंचे बेट झाले पर्यटन स्थळ

ABOUT THE AUTHOR

...view details