चंदीगढ : साडी घालून सरळ चालणेही कित्येक जणींना जमत नाही, त्यातच एक मुलगी साडी घालून चक्क जिम्नॅस्टिक स्टंट करतानाचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, मोठमोठ्या सेलिब्रिटींनीही या व्हिडिओला शेअर केले आहे. पारुल अरोरा असे या तरुणीचे नाव आहे, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती आता रातोरात स्टार झाली आहे.
गृहिणींना प्रेरणा देण्यासाठी बनवला व्हिडिओ..
पारुलने सांगितले, की साडी घालणाऱ्या गृहिणींना लोक 'चूल आणि मूल'मध्ये अडकलेल्या महिला समजतात. त्यांनी साडी घालणाऱ्या महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा, आणि गृहिणींनाही प्रेरणा मिळावी यासाठी आपण हा व्हिडिओ बनवल्याचे पारुलने सांगितले.
कोण आहे पारुल अरोरा?
पारुलचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी तिचा शोध घेतला. पारुल ही हरियाणाच्या अंबालाची रहिवासी असून, राष्ट्रीय स्तरावरील जिमनॅस्ट खेळाडू आहे. पारुलने आतापर्यंत कित्येक स्पर्धांमध्ये भाग घेत मेडलही जिंकले आहेत. दोन वर्षांपूर्वी तिने जिम्नॅस्टिक सोडले होते, आता ती केवळ असे व्हिडिओ बनवतानाच जिमनॅस्ट स्टंट करते.