नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलनाला सुरुच आहे. २६ मे रोजी या आंदोलनाला सहा महिने पूर्ण होतील. यानिमित्ताने संयुक्त किसान मोर्चाने हा दिवस 'ब्लॅक डे' म्हणून पाळण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी पंतप्रधान मोदी आपल्या कार्यालयात सात वर्षांचा कालावधी पूर्ण करतील.
ब्लॅक डे आंदोलनासाठी आवाहन..
संयुक्त किसान मोर्चाने या दिवशी देशभरातील शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर येण्याचे आवाहन केले आहे. "जिंदा है, तो दिल्ली आजा" असे घोषवाक्य या आंदोलनासाठी तयार करण्यात आले आहे. या घोषवाक्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आंदोलनास येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ज्यांना शक्य आहे त्यांनी सीमेवर यावे, अथवा आपल्या घरुनच या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असेही ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समितीचे सह-संयोजक अविक शाह यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या घरांवर, दुकानांवर किंवा कार्यालयांवर काळे झेंडे लाऊन या आंदोलनाला पाठिंबा दाखवावा, असे ते म्हणाले.