तिरुवनंतपुरम -भारतीय लष्कर देशासाठी आणि देशातील सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असते. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून उंच टेकडीवर अ़डकलेल्या एका ट्रेकरची ( Kerala Trekker Trapped On Hill ) जवानांनी सुटका केली आहे. केरळमधील पलक्कड भागातील एका उंच टेकडीवर एक ट्रेकर अडकला होता. गेल्या सोमवारपासून अडकलेल्या या तरुणाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आज जवानांनी त्याला सुखरुप बाहेर काढलं.
टेकडीवरून खाली आल्यानंतर तरुण अगदी आनंदी असल्याचे दिसून आले. त्याने जवानांचे आभार मानले. आर बाबू (R Babu) असे त्या ट्रेकरचे नाव आहे. आर बाबूने आपल्या साथीदारांसह कुरुंबाची टेकडीच्या माथ्यावर जाण्याचा बेत आखला होता. टेकडीवरून उतरत असताना तो घसरला आणि खडकात अ़डकला. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. याची माहिती त्याच्या मित्रांनी स्थानिक व पोलिसांना दिली. यानंतर त्याचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. तो तब्बल 45 तास टेकडीवरील खडकांमध्ये अडकला होता. 45 तासांपेक्षा जास्त काळ एका ठिकाणी अडकून पडला होता. त्या ठिकाणी लष्कराच्या बचाव पथकाचा एक सदस्य पोहोचला आणि त्याला अन्न आणि पाणी दिले.