तिरुअनंतपुरम - केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये डाव्या आघाडीसोबत असलेल्या राष्ट्रवादीला काँग्रेसला झटका बसला आहे. पाला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार मणी सी कप्पन यांनी रविवारी राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देऊन शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादीने कप्पन यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
गेल्या महिनाभरापासून मनी कपन्न यांनी यूडीएफमध्ये प्रेवशाचे प्रयत्न सुरू केले होते. या संदर्भात त्यांनी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेटही घेतली होती. मात्र, केरळ प्रदेशाध्यक्ष टी पी पितांबरन यांचा यूडीएफशी हातमिळवणी करण्यास विरोध होता. अखेेर रविवारी आमदार कप्पन यांनी काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीमध्ये यूडीएफमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या नेतृत्तावत ‘एश्वर्य केरळा’ या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ती संवाद यात्रा ज्यावेळी पाला मतदारसंघात पोहोचली त्यावेळी कप्पन यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसप्रणित यूडीएफमध्ये प्रवेश केला.
कप्पन यांचे स्वागत करताना चेन्निथला म्हणाले की, डावी आघाडी तर बुडते जहाज आहे, कप्पन त्या जहाजातून वाचले आहेत. यावेळी आमदार कप्पन यांनी केरळ काँग्रसचे(एम) चे नेते जोस के मणी यांच्यावर टीकास्त्र सोडताना आरोप केला की, जोस यांनी मी पालामध्ये सुरू केलेल्या विकास कामांना खीळ घालण्याचे काम केले आहे. तसेच एलडीएफने राष्ट्रवादीला चार जागा देण्याचे कबूल केले होते, त्यामुळे आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी आम्हाला पाला मतदारसंघाऐवजी कुट्टनाड मतदारसंघ देण्यात येईल, असे म्हटले. त्यामुळे कप्पन यांनी एलडीएफला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.
कप्पन नव्या पक्षाची करणार घोषणा?
सुत्रांच्या माहिती नुसार आमदार कप्पन हे लवकरच आपल्या स्वतंत्र पक्षाची घोषणा करणार आहेत. त्यांचा तो पक्ष यूडीएफचा भाग असेल. यापूर्वी कप्पन यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पाला मतदारसंघाची पोट निवडणूक लढवून विजय मिळवला होता. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस नेते तथा यूडीएफचे उमेदवार जोश टॉम यांचा पराभव केला होता. पाला विधानसभेची पोट निवडणूक केरळ काँग्रेसचे प्रमुख के एम मणी यांचे निधन झाल्याने लागली होती. मणी यांनी तब्बल ५० वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने पोट निवडणुकीत ही जागा खेचून आणली होती.