कोची -केरळमधील सोने तस्करी प्रकरणात केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाने राज्यातील पी. विजयन यांच्या सरकारला मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारने ईडीच्या विरोधात न्यायालयीन आयोगाची ज्या अधिसूचनेअंतर्गत स्थापना केली होती. उच्च न्यायालयाने त्या अधिसूचनेला अंतरिम स्थगिती दिली आहे. ईडी आणि सीमाशुल्क विभागाने मुख्यमंत्र्यांना सोने तस्करी प्रकरणात फसवण्याचा प्रयत्न केला आहे का, याची चौकशी करण्यासाठी आयोग गठीत करून न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले होते.
केरळमधील सोने तस्करी प्रकरणात मुख्यमंत्र्यांना गोवण्याच्या प्रयत्न झाल्याने ईडी आणि राज्य सरकार आमनेसामने आले होते. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे नाव आल्यानंतर परिणामांचा आढावा घेणे, हे आयोगाचे काम होते. 7 मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही.के मोहनन यांना आयोगाचे अध्यक्ष करण्यात आले होते.
निकाल देताना न्यायमूर्ती पीबी सुरेश कुमार म्हणाले, की अशा प्रकरणांमध्ये न्यायालयीन आयोग स्थापन करण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारला आहे. त्यामुळे ईडीविरोधात चौकशी कायद्याअंतर्गत आयोग स्थापन करण्याचा अधिकार राज्याला नाही. उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही के मोहनन यांची कथित गुन्ह्याच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर ही ईडीकडून याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने निर्णय दिला.