तिरुअनंतपुरम : हिंदू हा शब्द भौगोलिक संज्ञा आहे. तो एखाद्या विशिष्ट भागात जन्मलेल्यांना परिभाषित करते. त्यामुळे हिंदू हा धार्मीक नाही तर भौगोलिक शब्द असल्याचे केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद नसीम खान म्हणाले. ते तिरुअनंतपुरममध्ये उत्तर अमेरिकेतील केरळ हिंदूंनी आयोजित केलेल्या हिंदू कन्कलेव्हचे उद्घाटन करत होते. केरळ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका ही अमेरिकन देशांमध्ये राहणाऱ्या हिंदू कुटुंबातील सदस्यांची संघटना आहे.
तुम्ही मला हिंदू का म्हणत नाही :यावेळी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद नसीम खान यांनी माझी तुमच्याविरुद्ध गंभीर तक्रार असल्याचे स्पष्ट केले. 'तुम्ही मला हिंदू का म्हणत नाही ? असा सवाल त्यांनी यावेळी केला. मी हिंदू ही धार्मिक संज्ञा मानत नाही. हिंदू ही भौगोलिक संज्ञा आहे. जो कोणी भारतात जन्माला आला तो हिंदू आहे. त्यामुळे भारतात उत्पादित केलेल्या अन्नावर जगतो, जो कोणी भारतातील नद्यांचे पाणी पितो त्याला हिंदू म्हणण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
इंग्रजांच्या काळातील मजबुरींमुळे ठरवले नागरिकांचे हक्क :इंग्रजांच्या काळातील काही मजबुरींमुळे तुम्ही कोणत्या समाजात जन्माला आले, त्यावरुन नागरिकांचे हक्कही ठरवले जात होते. हिंदू, मुस्लिम ही संज्ञा वापरण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे महात्मा गांधींना दुसरा पर्याय नव्हता. मात्र हे त्या काळासाठी ठीक होते असेही राज्यपाल आरिफ मोहम्मद नसीम खान हे म्हणाले. ब्रिटिशांनी नागरिकांच्या सामान्य हक्कांचा निर्णय घेण्याचा आधार बनवला होता. त्या आधारावर त्यांनी स्वतंत्र मतदार संघ ठरवले. इंग्रजांचे वेगवेगळे व्हिजन होते. समाज कायमस्वरूपी विभाजित कसा राहील, यासाठी त्यांना प्रयत्न करत होते. समाज विभाजित राहिला तरच इंग्रजांना कायमस्वरुपी शासन करता येणार होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे इंग्रजांची फोडो व राज्य करा ही संकल्पना यशस्वी झाल्याचेही ते म्हणाले.
भारतात राहणारा प्रत्येकजण हिंदू :हिंदू ही धार्मीक संज्ञा असल्याचे आपण मानत नाही. हिंदू ही भौगोलिक संज्ञा आहे. त्यामुळे भारतात राहणारा प्रत्येक नागरिक हा हिंदूच आहे. येथील अन्नावर जगणारा हिंदू आहे. येथील नदीचे पाणी पिणाराही हिंदू आहे. त्यामुळे हिंदू ही संकल्पना व्यापक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे काही दाखलेही दिले आहेत.
हेही वाचा - Rakhi Sawant Mother Dies : राखी सावंतच्या आईचे मुंबईत निधन; कॅन्सरशी झुंज ठरली अयशस्वी