तिरुवअनंतपुरम :राजस्थानमध्ये गेल्या आठवड्यांपासून बर्ड-फ्लूमुळे शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तसेच, हिमाचल प्रदेशमध्येही हजारो पक्षांचा मृत्यू झाला होता. यानंतर आता केरळमध्येही बर्ड-फ्लूचा कहर सुरू झाला आहे. 'एच५एन८ एव्हिअन फ्लू' विषाणूमुळे पसरत असलेल्या या बर्ड-फ्लूला केरळमध्ये राज्य आपत्ती घोषित केले आहे.
कोट्टायम आणि आलापुळा जिल्ह्यात हाय अलर्ट..
एव्हियन इन्फ्लुएन्झा या विषाणूच्या एच५एन८ या स्ट्रेनमुळे हा विषाणू पसरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर या फ्लूचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोट्टायम आणि आलापुळा जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट घोषित केला आहे. आलापुळामधील नेदुमुदी, ताकाळी, पल्लीप्पाडू आणि कारुवट्टा या तालुक्यांमध्ये; तर कोट्टायमच्या नीनदूर तालुक्यात याचा सर्वाधिक फटका बसला आहे. यानंतर राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.