नवी दिल्लीKejriwal bungalow renovation case :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराच्या नूतनीकरणाच्या प्रकरणाची दखल घेत सीबीआयनं बुधवारी प्राथमिक तपास सुरू केला. आता सीबीआयचं एक पथक सर्व पुरावे तपासणार आहे. कथित भ्रष्टाचाराच्या आरोपात तथ्य आहे की नाही याची चौकशी सीबीआयच्या पथकानं सुरू केलीय. या घराच्या बांधकामाशी संबंधित सर्व कागदपत्रांची छाननी करण्यात येणार असून विविध विभागांच्या फायलींचीही छाननी होणार आहे.
- सीबीआय चौकशीचे आदेश :सीबीआय अधिकारी अधिकृतपणे काहीही बोलणं टाळत आहेत, मात्र एका अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, यापूर्वी केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणाशी संबंधित आरोपांबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. दिल्ली नायब राज्यपालांच्या शिफारशीनंतर हा आदेश देण्यात आला आहे.
'आप'चा भाजपावर हल्ला : सीबीआय तपास सुरू असताना, आम आदमी पक्षानं भाजपावर टीका केलीय. भाजपानं आम आदमी पार्टीचा नाश करण्यासाठी आपली सर्व शक्ती वापरली आहे. आता सर्व तपास यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेरलं आहे. दिल्लीतील 2 कोटी जनता अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आहे. या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही. भाजपाला कितीही चौकशी करायची असली, तरी अरविंद केजरीवाल जनतेच्या सर्वसामान्यांच्या हितासाठी लढत राहतील.